शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमाचे फोटो शरद पवार यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यावेळी शरद पवार यांनी बोलताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत बाळासाहेब ठाकरे आणि शदर पवार यांचे एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, स्नेह हे महाराष्ट्रात परत कधी दिसेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

“काही छायाचित्रकार आणि मुंबई विद्यापीठातर्फे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. माझ भाग्य की या कार्यक्रमाला मला साहेबांसोबत उपस्थित राहता आलं. बाळासाहेब ठाकरे आणि शदर पवार या दोघांचे संबंध, त्यांचा वैचारिक विरोध, त्यांच एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, स्नेह हे महाराष्ट्रात परत कधी दिसेल का? या प्रश्नने मला रात्रभर अस्वस्थ केले,” असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी “मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला,” असे म्हटले आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता. मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर येथे राहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्याचवेळेस शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होत होता, असेही शरद पवार म्हणाले.

“आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. त्याकाळात आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या, तासन् तास आमच्या गप्पा चालायच्या, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची. बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवनेतृत्व तयार केलं. या नेतृत्वातील बहुसंख्य नेते हे सामान्य घरातील होते. ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं,” असे शरद पवार म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction after sharad pawar visited the exhibition of photographs based on the life of shiv sena chief balasaheb thackeray abn
First published on: 19-05-2022 at 17:50 IST