scorecardresearch

“…त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही”, जितेंद्र आव्हाड यांचं पत्रकारांसमोर वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

jitendra awhad reaction on cm eknath shinde bhoomi pujan
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ठाण्यात अनधिकृत इमारतींच्या बांधकामाचं पिक आलं आहे. ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १० टक्के भागिदारी प्रमुख गुन्हेगारांना दिली जाते”, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. तसेच ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो, असाही आरोप केला. ते बुधवारी (८ मार्च) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १०-१० टक्के भागिदारी तेथील प्रमुख गुन्हेगारांना दिली गेली आहे. म्हणजे त्यांची गँग जोडली जाते. हे करण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेत एक माणूस बसवला आहे. तो हे सगळं सांभाळत आहे. सध्या ठाण्यात २००-३०० अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत.”

“अचानक ठाण्यात अनधिकृत इमारतींचं पीक कसं आलं?”

“अजूनही बांधल्या जात आहेत. यावर कुणीच काही बोलायला तयार नाही. संजीव जैसवाल यांच्या काळात एक अनधिकृत इमारत बांधली जात नव्हती. मग अचानक प्रशासनात असा काय बदल झाला की अनधिकृत इमारतींचं पीक आलं आहे,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“गुंडांचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “यातून गुंडगिरी फोफावत आहे. गुंडांचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे. मुंबईत एकेकाळी जे गँगवार झालं ते रिअल इस्टेटवरूनच झालं. ठाण्यातही ५-६ खून झाले. हे खून एखाद्या प्रकल्पात दगड, माती, विटा कोणी टाकायच्या यावरून गोळ्या घालण्यात आल्या, गँगवार झालं आणि ५-६ खून झाले.”

“ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि…”

“ठाण्यात एकूणच परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि त्याची तक्रारही घेतली जात नाही. पंढरी फडके नावाच्या प्रकरणामध्ये २० जणांना आरोपी करण्यात आलं, मोक्का लावला गेला. समोरच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यानंतर पंढरी फडकेला अटक केलं. मात्र, फडकेच्या समोरच्या बाजूच्या लोकांवर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलीस म्हणाले नोंदवणार नाही. ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही”, भर अधिवेशनात यशोमती ठाकूर भावुक

“त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही”

“मी अनुभवच घेतला. नशिबाने माझ्याबाबत जेव्हा जेव्हा न्यायालयाने भूमिका घेतली तेव्हा सांगितलं की ही केसच नाही. न्यायालयाने अक्षरशः नोंदवून ठेवलं आहे. यानंतर आणखी वाईट परिस्थिती निर्माण होईल. माझ्यासारखा माणूस या सर्व गोष्टींना उघडपणे विरोध करतो. त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही,” असंही आव्हाडांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 23:07 IST