माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सिंधी समाजाच्या बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप करत त्यांच्या भाषणाचा मूळ (ओरिजिनल) व्हिडीओ ट्वीट केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सिंधी समाजातील एका बदमाशाने मी केवळ उल्हासनगरमध्ये जाऊन माझ्या पक्षाचे नेते पप्पु कलानी यांना भेटतो आणि त्यांची बाजू घेतो म्हणून मला बदनाम करण्यासाठी माझ्या भाषणाचा मॉर्फ व्हिडीओ तयार केला. तसेच हा मॉर्फ व्हिडीओ संपूर्ण सिंधी समाजात व्हायरल केला.




“मी आता मूळ व्हिडीओ अपलोड करत आहे”
“मी आता मूळ व्हिडीओ अपलोड करत आहे. दोन दिवस चुकीचा व्हिडीओ प्रसारित करत सिंधी समाजाचा डोकं भडकावणारा कोण आहे? हे सिंधी समाजाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. हे कांड उल्हासनगरमध्ये झालं आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आता मला प्रशासनाला विचारायचं आहे की, मॉर्फ व्हिडीओ आणि मूळ (ओरिजिनल) व्हिडीओही समोर आला आहे. आता ते कुणावर गुन्हा दाखल करणार?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
“या घाणेरड्या माणसाला गंगास्नान नक्की घालणार”
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “सत्य समजून न घेता केवळ खोट्या वक्तव्यांवर आणि खोट्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करता येत नाही. सिंधी समाजाविषयी माझ्या मनात जो सन्मान आहे तो कालही होता, आजही आहे आणि नेहमी राहील. मात्र, या घाणेरड्या माणसाला गंगास्नान नक्की घालणार आहे. शिंदे गट आणि भाजपा नेत्यांनी हे लक्षात ठेवावं.”
हेही वाचा : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आव्हाडांवर उल्हासनगरात गुन्हा; सिंधी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपची तक्रार
“मला अडकवण्यासाठी किती प्रयत्न कराल”
“मला अडकवण्यासाठी किती प्रयत्न कराल. ठाणे पोलिसांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करताना एखाद्या अट्टल गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा अशी घाई केली. आता त्यांनी खोटा गुन्हा दाखल करायला लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.