राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. त्यांच्या या आरोपामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. या प्रकरणी क्लीप पाहून आणि राष्ट्रध्वज हाताळण्याचे नियम पाहून पुढील निर्णय घेऊ, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.
जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी विधानसभेत केला आणि याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेचा आपल्याकडे व्हिडिओ असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची एकमुखी मागणी अध्यक्षांकडे केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या सर्वाला विरोध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही राष्ट्रगीताचा अवमान झाला असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा कारवाईला विरोध केला. सभागृहात मोबाईल चित्रीकरण कोणी केले, कोणाच्या आदेशावरून केले, याचाही अध्यक्षांनी शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.