उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उपसभापती वसंत डावखरे यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करूनही जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रविवारपासून सुरू झालेले आंदोलन कायम ठेवले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारभाराला जेजेतील निवासी डॉक्टरांनी विरोध केला असून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या समस्येवर तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान जेजेमधील निवासी डॉक्टरांच्या संपाला मार्डच्या मुख्य कार्यकारिणीनेही पाठिंबा दिला आहे.

नेत्ररोगचिकित्सा विभागात काम करत असलेल्या निवासी डॉक्टरांना दिवसाचे १४ ते १८ तास कोणत्याही विश्रांतीशिवाय काम करावे लागत असून परिचारिका व शिपाई यांची कामेही निवासी डॉक्टरांकडून करून घेतली जातात, मात्र शस्त्रक्रिया शिकण्यापासून लांब ठेवले जाते व केवळ स्वत:ची कामगिरी उंचावून दाखवण्यासाठी उपयोग करून घेतला जातो, असे आरोप करत जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर रविवारपासून मास बंक करत आहेत.

सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून जेजेमधील निवासी डॉक्टरांनी निवेदन दिले. त्यानंतर मंगळवारी डॉ. लहाने यांच्याशीही निवासी डॉक्टरांनी चर्चा केली. त्या वेळी निवासी डॉक्टरांनी आपले मुद्दे व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र कोणताही तोडगा निघू शकला नसल्याने जेजेतील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचे ठरवले.  निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनेही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

डॉ. लहाने यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारभाराविरोधात गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेले आंदोलन त्वरित मागे घ्यावे आणि कामावर रुजू व्हावे असे निदेश विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांनी मंगळवारी दिले, तर लहाने यांच्या विरोधात डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.