मुंबई : जे. जे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचा मरिन ड्राईव्ह येथील अंत्यत मोक्याच्या जागी जिमखाना आहे. आतापर्यंत या जिमखान्यावर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नियंत्रण होते, मात्र मागील काही दिवसांपासून बंद असलेला जिमखाना ताब्यात घेण्याचे प्रयत्न वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातील (डीएमईआर) अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत, असा दावा ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडंड असोसिएशनकडून करण्यात आला. डीएमईआरच्या या धोरणाला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे.
जे. जे. जिमखाना मरिन ड्राईव्ह येथील सागरी किनाऱ्यालगत आहे. या ठिकाणी खासगी कार्यक्रम करण्याकडे उच्चभ्रू व्यक्तींचा कल असतो. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, बैठका आणि सर्वांगीण विकासासाठी हा जिमखाना अत्यंत महत्त्वाचा आहे. या जिमखान्यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. या जिमखान्याची काही महिन्यांपूर्वी पडझड झाली होती. तेव्हापासून तो बंद आहे. हीच संधी साधत डीएमईआरमधील काही अधिकाऱ्यांनी या जिमखान्याचे नियंत्रण स्वत:कडे घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जिमखान्याचा पीपीपी तत्वावर विकास करून त्याचा वापर व्यावसायिक कामासाठी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे. त्यासाठी जिमखाना विद्यार्थ्यांच्या ताब्यातून काढून घेण्यात येणार असल्याचा दावा ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडंड असोसिएशनने केला आहे. सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी विद्यार्थी शुक्रवारी थेट जे. जे. जिमखान्यावर गेले होते. मात्र परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली. ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडंड असोसिएशनने या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांना कोणताही सकारत्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
जिमखाना ही फक्त एक इमारत नाही. ती आमच्या संस्थेच्या वारशाचे आणि विद्यार्थ्यांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणून त्याचे इतर कोणत्याही स्वरूपात रूपांतर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मैदान राहिले पाहिजे, असे जे.जे. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस जिमखान्यासोबत आमचा काही वाद असल्याने आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण नेले. त्यांनी जिमखान्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यात सहा उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पण विद्यार्थ्यांचा समावेश नव्हता. यामध्ये अधिष्ठाता यांचा समावेश असला तरी जिमखान्याच्या निर्णयाबाबत काहीच कळविले जात नाही. सरकारच्या या भूमिकेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. येत्या काही दिवसांत यावर सरकारने निर्णय न घेतल्यास जे. जे. रुग्णालयातील सर्व डॉक्टर उपोषणाला बसतील, असा इशारा ग्रँट मेडिकल कॉलेज स्टुडंड असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. ऋषिकेश शिंदे यांनी दिला.
