मुंबई : सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे अधिकार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना असतानाही ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी नियुक्त केलेल्या १९ प्राध्यापकांची सेवा वैद्यकीय शिक्षण विभागाने तडकफडकी रद्द केली. या डॉक्टरांना व्हॉट्सॲपद्वारे मेसेज पाठवून त्यांची सेवा संपुष्टात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकारामुळे जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या १८ जुलै २०२४ रोजीच्या निर्णयानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांवर तात्पुरत्या नियुक्त्या करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना अधिकार देण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय समूहातील अनेक विभागांतील रिक्त जागा आहेत. रिक्त जागांमुळे रुग्णसेवेवर होणारा परिणाम आणि उपलब्ध डॉक्टरांवर येणारा लक्षात घेऊन अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी निमवैद्यकीय विभागातील रिक्त जागांवर हृदयरोगशास्त्र, सीटीव्हीएस, मज्जासंस्था शस्त्रक्रिया आणि नेत्ररोगशास्त्र विभागातील डॉक्टरांची नियुक्ती केली होती. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी सोमवारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या या डॉक्टरांना तडकफडकी कामावरून काढून टाकले. या डॉक्टरांना व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून त्यांची सेवा संपुष्टात आल्याचे त्यांना कळवण्यात आले. अनेक डॉक्टर हे दुपारी शस्त्रक्रियागृहामध्ये शस्त्रक्रिया करत असताना त्यांना नियुक्ती रद्द केल्याचे संदेश आले. या प्रकारामुळे डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
सहाय्यक प्राध्यापकांच्या या नियुक्त्यांमध्ये शासनाच्या विहित कार्यपद्धतीचे उल्लंघन झाले असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने कळविल्यानंतर या सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या जेजे रुग्णालय प्रशासनाने तात्काळ रद्द केल्या. याप्रकरणी १९ सहाय्यक प्राध्यापकांनी न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.
वरिष्ठ प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विभागात रुग्णसेवा कमी असते किंवा नॉन क्लीनिकल विभाग असतात. त्या विभागातील सहाय्य्क प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्पुरत्या स्वरूपात रूपांतरित करून ज्या विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी येतात. त्या ठिकाणी भरल्या जातात. मात्र मूळ विभागातील रिक्त पदावर कुणी उमेदवार आल्यास त्याला ती जागा पुन्हा दिली जाते. रुग्णसेवा मिळावी म्हणून अशा पद्धतीची तात्पुरती सोय राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यलयांतील अधिष्ठाता करत असतात. परंतु, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असते, अनेकवेळा रुग्णहिताचा विचार करून ही परवानगी दिली जाते.
त्या सहाय्यक प्राध्यापकांची फेरनियुक्ती करावी
सेवा समाप्त केलेल्या १९ सहाय्यक प्राध्यापकांना फेरनियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. या विषयावर संघटनेचे पदाधिकारी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांची मंगळवारी भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
जे. जे. रुग्णालय समूहामध्ये रुग्णसेवेचे सातत्य, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि आवश्यक अध्यापक मनुष्यबळ कायम ठेवणे हे सार्वजनिक हिताचे आहे. त्यामुळे प्राध्यापकांना कामावरून काढण्याचा नियम तातडीने मागे घ्यावा, याबाबात तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. – डॉ. सचिन मुलकुटकर, प्रवर्तक, महाराष्ट्र राज्य मेडिकल टीचर्स असोसिएशन.
