मुंबई : सर जे.जे. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात देशातील पहिले ””लेझी आय”” (आळशी डोळा – एम्बलियोपिया) आणि दोन्ही डोळ्यांच्या समन्वयाशी संबंधित विकारांवर उपचारासाठी सरकारी ए आय – आधारित व्हिजन थेरपी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल थेरपीच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. हे केंद्र बायनॉक्स या जागतिक डिजिटल थेरपी कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे.या विभागाचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता चहांदे यांच्या हस्ते झाले. ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
लेझी आय’ अर्थात ॲम्ब्लायोपिया हा मुलांमधील टाळता येण्याजोग्या दृष्टीदोषांपैकी सर्वात मोठा आजार मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ३ ते ५ टक्के लोकांमध्ये हा आजार आढळतो. वेळेत उपचार न झाल्यास आयुष्यभरासाठी दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण होतो. या विकारामुळे दुहेरी दिसणे, डोळ्यांवर ताण येणे, डोकेदुखी, खोलीचा अंदाज न येणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. हा त्रास मुलांबरोबरच प्रौढांनाही होतो.
नवीन क्लिनिकमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) आणि खेळांवर – आधारित डिजिटल थेरपीच्या मदतीने रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचार योजना तयार केली जाईल. उपचार रुग्णालयात तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून घरबसल्या घेण्याची सुविधाही उपलब्ध असेल. एआयच्या मदतीने डॉक्टर रुग्णांच्या उपचारातील प्रगतीवर सतत लक्ष ठेवू शकतील.
आधुनिक डिजिटल थेरपी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे सरकारी रुग्णालयातही ”लेझी आय” आणि इतर दृष्टीविकारांवर प्रभावी व सुलभ उपचार मिळतील, असे जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे यांनी सांगितले.नवीन तंत्रज्ञानामुळे मोठ्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्येही उपचाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारी रुग्णालयात असे एआय -आधारित क्लिनिक सुरू होणे हा देशासाठी महत्त्वाचा टप्पा असून लाखो रुग्णांना त्याचा फायदा होईल, असे नेत्रविकार विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता चहांदे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे सर जे.जे. रुग्णालयात जागतिक दर्जाच्या, आधुनिक आणि परवडणाऱ्या नेत्रोपचार सेवा उपलब्ध होणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ए आय -आधारित नेत्रोपचाराचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
