मुंबई : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयातील हृदयरोग विभागाने महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) राखीव निधीअंतर्गत पहिली ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टावी) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जे.जे. रुग्णालयाने अत्याधुनिक हृदयरोग उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
जालना जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ६३ वर्षीय रुग्णाला तीव्र एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस तसेच गुंतागुंतीचा कोरोनरी धमनी आजार होता. यापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया, तसेच अनेक अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यामुळे हा रुग्णावर शस्त्रक्रिया करणे जाेखमीचे होते. सुरुवातीला रुग्णासाठी सर्जिकल एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट हा उपचार पर्याय विचारात घेण्यात आला. मात्र, पूर्वीची बायपास शस्त्रक्रिया, अनेक कोरोनरी प्रोसीजर आणि वाढलेली शस्त्रक्रिया जोखीम लक्षात घेऊन हृदयरोग विभाग व कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी (सीव्हीटीएस) विभागाच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या
”हार्ट टीम”च्या अनेक बैठका घेण्यात आल्या. सखोल चर्चेनंतर रुग्णासाठी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टावी) हा सर्वात सुरक्षित पर्याय व योग्य उपचार असल्याचा एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार प्रथम रुग्णाची आवश्यक अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या करण्यात आली. त्यानंतर २९ जुलै रोजी नियोजनपूर्वक टावी प्रक्रिया पार पाडण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राखीव निधीच्या माध्यमातून टावी ही अत्याधुनिक आणि जीव वाचविणारी उपचार पद्धती रुग्णाला पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे उपचारासाठी आर्थिक अडचण अडथळा ठरली नाही. जे. जे. रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राखीव निधी अंतर्गत करण्यात आलेली ही पहिली टावी प्रक्रिया आहे. सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही अत्याधुनिक हृदयरोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. अजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. समकीत मुथा, हृदयरोग विभागातील डॉक्टर व कर्मचारी, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी विभाग तसेच भूलतज्ज्ञ विभागाच्या संपूर्ण तुकडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही जटिल प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ही कामगिरी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, बहुविभागीय समन्वय रुग्णकेंद्रित सेवाभाव व शासनाची एमजेपीजेवाय योजना यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.
