मुंबई :जे. जे. रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या प्रथम वर्ष निवासी डॉक्टरने मंगळवारी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. अभयसिंह मोरे असे डॉक्टरचे नाव असून तो मागील काही महिन्यांपासून मानसिक तणाव आणि नैराश्याने त्रस्त होता.

अभयसिंह मोरे फेब्रुवारीमध्ये जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून रुजू झाला होता. तो मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावात होत. त्याच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे रेडिओलॉजी विभागात कामासाठी आला नाही. त्यामुळे दुपारी त्याचे काही सहकारी त्याला बघण्यासाठी वसतिगृहात गेले. त्यावेळी वसतिगृहातील खोलीत त्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे निवासी डॉक्टरांवरील ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.