डॉ. लहाने यांनी केलेले उपचार यशस्वी

संदीप आचार्य

मुंबई: मोफत शस्त्रक्रिया शिबिरे आणि जे.जे.तील नेत्रचिकित्सा विभागाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या कौशल्यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या आवारातील तळ्यातील एका बदकालाही दृष्टिलाभ झाला. डॉ. लहाने यांनीच जोपासलेल्या बागेतील तळ्यातील एका बदकाला दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले. आता ते बदक अन्य बदकांबरोबर बागेत मुक्त विहार करत आहे.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नेत्ररुग्णांचे दृष्टिदोष दूर करणारे डॉ. लहाने यांच्यासाठीही बदकाला मिळालेल्या नव्या दृष्टीचे अप्रुप आहे. जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागालगत असलेल्या मोकळ्या जागेत जेथे एकेकाळी कचरा टाकला जायचा तेथे त्यांनी सूर्यफुलाच्या शेतीपासून गुलाबाचे ताटवे फुलविण्यापर्यंत अनेक प्रयोग केले. अलीकडेच या जागेत त्यांनी एक सुंदर बाग तयार केली असून तेथे अनेक दुर्मीळ पक्षी तसेच मुंबईतून अदृश्य होत असलेल्या रंगीत चिमण्या मुक्तसंचार करत असतात. येथेच डॉ. लहाने यांनी छोटेसे तळेही तयार केले आहे. या तळ्यात बदकेही आहेत. यातील एका बदक तळ्यात आल्यानंतर तेथून बाहेर पडण्याऐवजी तेथेच गिरक्या घेत बसायचे तसेच बाहेर पडल्यावर पिंजऱ्यात जाताना त्याची होत असलेली धडपड पाहून त्याची दृष्टी गेली असावी, अशी शंका विद्यमान विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख यांना आली व त्यांनी ती डॉ. लहाने यांना सांगितली. या दोघांनीही बदकाच्या डोळ्यांची तपासणी केली असता त्याला डोळ्यांचा अल्सर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉ. लहाने  यांनी उपचाराबाबतची आवश्यक माहिती घेऊन त्याच्या डोळ्यांत औषधाचे थेंब टाकण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम काही दिवसांतच दिसून आला. ‘आजही त्याच्या डोळयांत टिका असल्यामुळे त्याला थोडे तिरके पाहून दिसते. मात्र, आता ते छोटय़ाशा तळ्यात छान मस्ती करते, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.  

कचऱ्याच्या जागेत मनमोहक बाग

जे. जे. तील नेत्रचिकित्सा विभागाला लागून सुमारे दहा हजार चौरस फुटांची जागा आहे. डॉ. लहाने यांनी ती जागा साफ करून घेतली. येथून जवळपास २८ ट्रक कचरा हटवण्यात आला व मोकळ्या जागेत झेंडू, हरळ यांची लागवड करण्यात आली. मात्र, तो प्रयोग अपयशी ठरल्यानंतर येथे सूर्यफुलाची शेती करण्यात आली. ती चांगली बहरल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. ‘दरवर्षी मी शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत असतो. या बागेत जास्वंदीपासून वेगवेगळी फुलझाडे फुलली आहेत. िलबाचे व चिकूचे झाड लावले आहे. या बागेत एक छोटे तळे बनवण्याची कल्पना डॉ. पारेख यांनी मांडली. छान हिरवळ त्यात स्वच्छ असे तळे आणि त्यात विहरणारी बदके हे दृश्य तुम्हाला कोणत्याही रुग्णालयात पाहायला मिळणार नाही,’ असे डॉ. लहाने म्हणाले.

साडेतीन लाख शस्त्रक्रिया

गेल्या तीन दशकात डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी जे.जे. रुग्णालयात तब्बल साडेतीन लाख शस्त्रक्रिया केल्या आहेत. यातील एक लाख ६२ हजार शस्त्रक्रिया या डॉ. लहाने यांनी तर ७५ हजाराहून जास्त शस्त्रक्रिया डॉ. पारेख यांनी केल्या आहेत. याशिवाय ५० लाखाहून अधिक रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागात करण्यात आली आहे.