मुंबई : जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे दिव्यांग कलाकारांसाठी आयोजित विशेष कला कार्यशाळेमध्ये ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत या कलाकारांनी परिपूर्ण चित्रे रेखाटत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन यांच्या सहकार्याने व आयसोवा आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ एप्रिल दरम्यान आयोजित कार्यशाळेत मुंबई आणि परिसरातील विविध संस्थांमधील ४२ दिव्यांग कलाकार उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. या कार्यशाळेत १८ पेक्षा अधिक संस्थां सहभागी झाल्या.
आयसोवाच्या अध्यक्ष मीनाक्षी अग्रवाल यांनी पुढाकार घेत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ऑटिझम, डाउन सिंड्रोम, बौद्धिक दिव्यांगत्व, श्रवणदोष, अल्पदृष्टी, पॅराप्लेजिया अशा विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करत या कलाकारांनी कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कलाकारांनी सूक्ष्म तपशीलांनी परिपूर्ण चित्रे रेखाटली. प्रत्येकाच्या कलेत त्यांचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन दिसून येत होता.
त्यांच्या प्रत्येक रेषेत एक प्रयत्न, प्रत्येक रंगात एक जिद्द आणि प्रत्येक चित्रात मीही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास दिसत होता. दिव्यांग कलाकारांसाठी कलाही एक वेगळीच ओळख निर्माण करते. त्यांच्या आयुष्यातील आव्हाने, संघर्ष आणि अनुभव हे त्यांच्या कलेतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे रंग त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडतात. कधीकधी एक साधे चित्रही त्यांच्या मनातील खोल विचार आणि भावना व्यक्त करून जाते. शारीरिक किंवा बौद्धिक अडचणी असूनही ही मुल कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
या कार्यशाळेचा उद्देश सर्जनशील चित्रकला सत्रे, कौशल्य विकास उपक्रम, आत्मविश्वास वाढविण्याच्या संधी आणि कला क्षेत्रातील करिअर मार्गांची ओळख करून देणे हा आहे. या कार्यशाळेचा समारोप ८ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्रप्रदर्शनाने होणार आहे. दुपारी ३ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य सभागृहात या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, ८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
