८ कोटींचा प्रस्ताव; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

जोगेश्वरी पूर्वेकडील म्हाडा वसाहतीमध्ये व मेघवाडी येथे पोलिसांच्या वसाहती असून गेल्या अनेक दिवसांपासून या वसाहतींना मरण अवकळा आली असून त्या धोकादायक अवस्थेत आहेत. यातील काही इमारतींमधील सदनिकांच्या छतांचे भाग कोसळून अपघातही झाले आहेत. मात्र, तरी यांची दुरुस्ती न झाल्याने येथील पोलीस कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जगावे लागते आहे. या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारला जाग आली असून या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अखेर ८ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील विकास कामे तसेच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत राज्यमंत्री वायकर यांनी सोमवारी मंत्रालयात बठक घेतली त्या वेळी याबाबतचा निर्णय घेतला.

जोगेश्वरी पूर्व येथे ‘म्हाडा’ वसाहतीमध्ये पोलिसांच्या एकूण १३ इमारती असून यात १०७९ सदनिका आहेत. तसेच मेघवाडी येथे पोलिसांच्या १० इमारतींमध्ये १०० सदनिका आहेत. यातील काही वसाहती या धोकादायक झाल्या आहेत. यातील काही इमारतींमधील सदनिकांच्या छताचे तसेच इमारतीचे स्लॅब कोसळून अपघात घडल्याने काही जण जखमी झाले होते. मात्र, अद्याप या इमारतींसाठी दुरुस्तीचा निधीच उपलब्ध न झाल्याने येथील पोलीस कुटुंबीय नाराज झाले आहेत. अखेर याबाबत सरकार ताळ्यावर आले असून या इमारतींना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यात बैठक झाली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या वेळी या इमारतींच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी २८ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास अथवा पोलीस गृहनिर्माण विभागाकडून निधी प्राप्त झाल्यास त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल. तसेच तात्काळ निधी उपलब्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची संयुक्त भेट घेण्याचा निर्णय या बठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर जोगेश्वरीतील एसआरपीएफ कॅम्पमधील अंतर्गत रस्ते दुरुस्ती करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. याबाबतही लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन पाटील यांनी वायकर यांना दिले.