मुंबई : जोगेश्वरी जंक्शनवरून जानेवारी २०२७ पासून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रेल्वे, मेट्रो आणि इतर वाहतूक सेवांना जोडणारा आधुनिक मल्टीमोडल ट्रान्झिट हब म्हणून जोगेश्वरी स्थानकाचा विकास करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात हॉटेल आणि शॉपिंग मॉल उभारण्याचाही विचार सुरू आहे.
खासदार रवींद्र वायकर आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या आढावा बैठकीत मतदारसंघातील अनेक प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, जोगेश्वरी जंक्शनचा विकास रेल्वे, मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थांना अखंड जोडणी देणाऱ्या केंद्राच्या स्वरूपात केला जात आहे. या प्रकल्पात चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था असेल. तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात हॉटेल आणि शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रस्तावही आहे.
जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज २४ डब्यांच्या १२ एक्स्प्रेस चालविण्याचे नियोजन केले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ ऐवजी २४ एक्स्प्रेस धावतील. या टर्मिनलमध्ये सुरुवातीला तीन फलाट उभारण्यात येत असून, भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीचा विचार करून आणखी दोन अतिरिक्त फलाट उभारण्यात येतील. जोगेश्वरी हे फक्त रेल्वे टर्मिनस न राहता मुंबईतील महत्त्वाचे ट्रान्झिट आणि इंटरचेंज हब म्हणून उदयास येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकी ६ मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल बांधण्यात येत आहे. प्रत्येकी तीन एस्केलेटर आणि तीन लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसह सर्व प्रवाशांना स्थानकात सहज व सुरक्षितपणे वावरता येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गोरगाव-बोरिवली हार्बर मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण होणार
या बैठकीत गोरगाव – बोरिवली हार्बर मार्ग विस्तार प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. ७.०८ किमी लांबीच्या आणि ८९८.२९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे लोकलची क्षमता वाढण्याबरोबरच पश्चिम उपनगरातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम होणार आहे.
अंधेरीत १५ डब्यांच्या लोकलचा मार्ग मोकळा
अंधेरी स्थानकातील फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल सेवा चालविणे शक्य होणार आहे. तसेच वांद्रे – अंधेरीदरम्यान धीम्या मार्गावरील फलाट विस्ताराचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२७ पासून त्याचा लाभ प्रवाशांना मिळण्याची शक्यता आहे.
लिफ्ट, सरकते जिने आणि प्रवासी सुविधांवर भर
प्रवासी सुविधांच्या दृष्टीने अंधेरी स्थानकावर एक अतिरिक्त उद््वाहन (लिफ्ट) ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू होणार आहे. याशिवाय दोन नवीन सरकते जिने जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जोगेश्वरी स्थानकातही एक नवीन सरकता जिना मंजूर झाला असून तोही जून २०२७ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकांतील स्वच्छता, स्तनपान कक्ष, दिव्यांगांसाठी अधिक सुलभ सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे. तसेच स्थानकांवरील सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जोगेश्वरी स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
