मुंबई : महापालिकेच्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात विविध आजारांवरील उपचारासाठी खरेदी करण्यात आलेली २५ कोटी रुपयांचे डीएसए हे यंत्र २०१८ पासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून या आरोग्य व्यवस्थेतील विविध त्रुटींवर महापालिका सभागृहात लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. सुमारे नऊ वर्षांपासून बंद असलेले डीएसए यंत्र तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश महापौर रितू तावडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेबाबतची समस्या मांडत उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. मुंबईत पावसाळ्यात डेंग्यू, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो व स्वाइन फ्लू यासारखे साथीचे आजार झपाट्याने वाढतात. या आजारांना रोखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई महापालिका व्यापक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

रुग्णालयातील विविध विभागांत अतिरिक्त रुग्णक्षय्या तातडीने उपलब्ध करणे, अतिदक्षता विभागात डॉक्टर व परिचारिकांची संख्या वाढविणे, रुग्णालयात औषधे व इंजेक्शन यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करणे, तसेच, साथीचे आजार पसरू नयेत, म्हणून स्वच्छता ठेवणे. विविध चाचण्यांची रुग्णालयातच विनामूल्य सेवा उपलब्ध करून देणे आदी विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.

जून व जुलै या पावसाळी महिन्यात कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक तेल उपलब्ध न झाल्याने व धुम्रफवारणी मशीनही ठिकठिकाणी उपलब्ध न झाल्याने झाल्याने डासांची वाढ झाली व साथीच्या आजाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) सचिन पडवळ यांनी केला.

पालिका रुग्णालयांची पाहणी केली असता सुरक्षारक्षकांपासून ते रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, तंत्रज्ञ , कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. नगरसेवक जमीर कुरेशी यांनी साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्या व गेल्या काही महिन्यांत साथीच्या आजाराने मृत पावलेल्या रुग्णांची माहिती देत पालिकेने तातडीने अधिक चांगली उपाययोजना करण्याची मागणी केली.

पालिकेने साथीच्या आजारांना रोखण्यासाठी डास निर्मूलन मोहीम हाती घेतली असून धूम्रफवारणी, घरोघरी डासांची पैदास रोखण्यासाठी तपासणी मोहीमही सुरू असल्याचे सांगितले. ऑगस्टमध्ये ५० हजार घरांची तपासणी करण्यात आली आहे. पालिकेने अडीच लाख रुग्णांची तपासणी केली आहे. ७१ हजार नमुने तपासले आहेत. त्याचप्रमाणे डास निर्मूलन करण्यासाठी आवश्यक कीटकनाशकांची खरेदी करून त्याचे वितरण आणि वापर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.