मुंबई : अपघातात डोक्याला गंभीर इजा झालेल्या अनेकांना मज्जासंस्थेसंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागतो. या रुग्णांवर तातडीने उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेले डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) यंत्र जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शिवाय, मेंदूशी संबंधित विकारांवरील शस्त्रक्रियांसाठी (न्यूरोसर्जरी) आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यासह येत्या काही दिवसांत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.
त्यानंतर शस्त्रक्रिया सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी रुग्णालय प्रशासन करील. या यंत्रामुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तसेच पक्षाघाताच्या रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. सुमारे २५ कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) यंत्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.
जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयातील न्यूरोसर्जरी सेवा आता अधिक सक्षम होणार असून, रुग्णालयात उपलब्ध असलेली सुमारे २५ कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) यंत्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.
जोगेश्वरी ट्रॉमा केअर हे अपघातग्रस्त रुग्णांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग व परिसरातील अपघातांमुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेले, पक्षाघात झालेले वा तातडीच्या मेंदूशी संबंधित उपचारांची गरज असलेले रुग्ण येथे मोठ्या प्रमाणावर येतात. अशा रुग्णांसाठी वेळेत निदान व उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णालयात अनेक वर्षांपासून डीएसए यंत्र उपलब्ध होते. मात्र, त्याचा अपेक्षित वापर होत नव्हता.
रुग्णालयात दररोज साधारणपणे १५० च्या आसपास रुग्ण येतात. रुग्णांची ही संख्या लक्षात घेता कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी ही सुविधा पुन्हा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांना दिल्या. त्यानुसार ही सुविधा पुन्हा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने पावले उचलली. या यंत्राचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने न्यूरोसर्जरी विभागाची सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुविधेसाठी तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डीएसए म्हणजे काय ?
‘डीएसए’च्या साह्याने् मेंदू व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते. अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांच्या उपचारात वेळेला मोठे महत्त्व असते. अशा परिस्थितीत निदान आणि आवश्यक उपचार लवकर झाल्यास रुग्णाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयात ही सुविधा कार्यान्वित होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
