मुंबई : करोना काळात म्हणजेच २०२१ मध्ये जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाला देणगी स्वरुपात मिळालेली ५५ लाख रुपये किमतीची वापराविना पडून असलेली पोर्टेबल क्ष किरण यंत्रणा अखेर पाच वर्षांनी सुरू झाली. सध्या रुग्णालयात कार्यरत क्ष किरण यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी विभागात केलेल्या पाहणीमध्ये पाच वर्षांपासून क्ष किरण यंत्रणा वापराविना पडून असल्याचे लक्षात आले. रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने यंत्राची तपासणी करून त्यातील काही किरकोळ दुरुस्ती करत क्ष किरण यंत्रणा सुरू केली. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
जाेगेश्वरी येथील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये सध्या कार्यरत असलेली क्ष किरण यंत्रणा वारंवार बंद पडत होती. त्यामुळे रुग्णांना कूपर किंवा अन्य सरकारी रुग्णालयामध्ये पाठविण्यात येत होते. रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांनी नवीन यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे नवे यंत्र येण्यासाठी साधारण सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता होती. त्याचदरम्यान डॉ. क्षीरसागर यांना क्ष किरण विभागाच्या पाहणीमध्ये पाच वर्षांपासून वापराविना पोर्टेबल क्ष किरण यंत्रणा पडून असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
डॉ. क्षीरसागर यांनी ही बाब अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांना कळवताच त्यांनी तातडीने यंत्र दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. डॉ. क्षीरसागर यांनी मुंबई महानगरपालिका आणि युनायटेड वे ऑफ मुंबई या कंपनीच्या तंत्रज्ञांना बोलवून यंत्राची तपासणी केली. यामध्ये यंत्र सुरू करण्यासंदर्भात (इन्स्टॉलेशन) आणि सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे लक्षात आले. यंत्रामध्ये असलेले विंडोज ७ आधारित सॉफ्टवेअरची समस्या दूर केली. तसेच यंत्राची किरकोळ दुरुस्ती केली असता क्ष किरण यंत्र सुरू झाले. हे यंत्र सुरू झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी सोयीचे
५५ लाख रुपये किमतीचे हे यंत्र नियमित क्ष किरणासाठी वापरता येण्याबरोबरच पोर्टेबल स्वरूपातही वापरता येणारे आहे. त्यामुळे रुग्णकक्ष किंवा अतिदक्षता विभागातील हालचाल करता न येणाऱ्या रुग्णांना क्ष किरणासाठी यंत्राजवळ नेण्याची गरज भासणार नाही. हे यंत्र रुग्णकक्ष किंवा अतिदक्षता विभागामध्ये नेऊन रुग्णांचे एक्स-रे घेता येणार आहेत. तसेच या यंत्राद्वारे एक्स-रेची प्रिंटही घेता येते.
नियमित सेवा सुरू ठेवणार रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्ष किरण यंत्राला हे यंत्र पर्यायी सुविधा म्हणूनही उपयोगी ठरणार आहे. विद्यमान यंत्र काही कारणाने बंद पडल्यास रुग्णांची क्ष किरण सेवा ठप्प होऊ नये, यासाठी नव्या यंत्राचा वापर करता येणार आहे. त्यामुळे नियमित सेवा सुरू ठेवणे शक्य होणार आहे. – डॉ. निरंजन क्षीरसागर, वैद्यकीय अधीक्षक, हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालय
