मुंबई : जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. त्याचप्रमाणे २०२१ ते २०२४ या कालावधीतील त्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजनेचे पैसेही भरण्यात आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासूनच कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील साफसफाईच्या कामाची दैना झाल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.
ट्रॉमा केअर रुग्णालयात केअर वन कंपनी आणि केएचएफएम कंपनीला रुग्णालयातील साफसफाईसाठी बहुउद्देशीय कामगार पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र या दोन्ही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच केअर वन कंपनी अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील २७ दिवसांचे तर केएचएफएम कंपनीने मागील १५ महिन्यांचे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विम्याचे पैसे भरलेले नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणिते बिघडले होती. त्यातच मागील तीन महिन्यांपासून या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जवळपास १५० रुग्णांना कंत्राटदाराकडून वेतनच देण्यात आले नाही.
ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये कायम कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने या रुग्णालयातील सर्व भार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. कंत्राटदाराकडून अपुरे वेतन दिले जात असताना हे कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णसेवा व रुग्णालयातील साफसफाई करत होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून त्यांना वेतनच देण्यात आलेले नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
अस्वच्छता पसरुन रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम
कामबंद आंदोलनामुळे रुग्णालयातील साफसफाईवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रुग्णकक्षासह बाकी परिसरात कचरा तसाच पडून आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. परिणामी रुग्णालयामध्ये अस्वच्छता पसरून त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागण्या काय आहेत ?
मागील ३ महिन्यांचे प्रलंबित वेतन तातडीने देणे, मागील ३ वर्षापासून भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विम्याचे अंशदान जमा करणे, मागील ८ वर्षातील किमान वेतन व प्रत्यक्ष अदा वेतन यांतील फरकाची रक्कम अदा करणे.
प्रशासनाचे म्हणणे
कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांच्या रखडविण्यात आलेल्या वेतनाबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.
