मुंबई : तीन महिन्यामचे प्रलंबित वेतन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार करत जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी जोरदार आंदोलन केले. सलग तीन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. नवीन रुग्ण दाखल करून घेतले जात नसून, त्यांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित केले जात आहे, तसेच रुग्णालयातील स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे.
सलग तीन महिने वेतन न झाल्याने ट्रॉमा केअर रुग्णालयातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. पहिल्या दिवशी रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नसला तरी स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. मात्र सलग तीन दिवस आंदोलन सुरूच असल्याने त्याचा रुग्णसेवेवर अधिक परिणाम होऊ लागला आहे. कर्मचारी नसल्याने रुग्ण नोंदणी करणे, क्ष किरण काढण्याचे शुल्क घेणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणे, शस्त्रक्रियेच्या वेळी उपकरणांची साफसफाई करणे अशी अनेक कामे खोळंबली आहेत.
शस्त्रक्रिया खोळंबल्या; रुग्णसेवा कोलमडली
मुंबई महानगरपालिकेचे कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरू ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे, मात्र अन्य रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांनाही घरी सोडण्यात येत आहे. शस्त्रक्रियागृहाची साफसफाई करणे, तेथील उपकरणांची साफसफाई करणे यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागत आहेत, तर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित केले जात आहे.
बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात येते
रुग्ण सेवा कोलमडत असल्याने रुग्णालय प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्यात येत आहे, मात्र या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनकर्ते अडवत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.
वेतन मिळाल्याशिवाय माघार नाही
प्रलंबित वेतन व अन्य देय मागण्यांसंदर्भात यापूर्वी अनेकदा प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात येत होते. मात्र आता तीन महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
