मुंबई : जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांनी मागील पाच दिवसांपासून संप पुकाला असून या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय विभागात आता एकही डॉक्टर नसल्याने रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. डॉक्टरांअभावी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, रुग्णकक्ष आणि आपत्कालीन विभागातील सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत.
वैद्यकीय विभागात एकही डॉक्टर नाही
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या वैद्यकीय विभागामध्ये दोन एमडी डॉक्टर, तर तीन निवासी डॉक्टर असे पाच डॉक्टर कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एमडी व निवासी डॉक्टरांपैकी प्रत्येकी एका डॉक्टरने राजीनामा दिला, तसेच निवासी डॉक्टरपैकी एका डॉक्टरच्या पायाचे हाड मोडल्याने ते रजेवर गेले. पाचपैकी तीन डॉक्टर नसल्याने रुग्णालयातील वैद्यकीय विभागातील रुग्णांचा ताण दोन डॉक्टरांवर येत होता. अन्य एमडी डॉक्टर कामाचा ताण येत असल्याने ते रजेवर गेले. तर उरलेले एक निवासी डॉक्टर कामाच्या ताणामुळे आजारी पडले. परिणामी, सध्या वैद्यकीय विभागात एकही डॉक्टर कार्यरत नाही.
अन्य विभागाच्या डॉक्टरांवर जबाबदारी
वैद्यकीय विभागामध्ये डॉक्टरच नसल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालिन विभाग, रुग्णकक्षामध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नाही. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने अस्थिव्यंग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, नेत्रविभाग, कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र हे डॉक्टर केवळ प्राथमिक लक्षणांवर उपचार करू शकतात. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्याला अन्यत्र पाठविण्यात येत आहे. रुग्णाची परिस्थििती गंभीर असल्यास त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात यावे, अशा सूचनाही रुग्णालय प्रशासनाने या डॉक्टरांना दिल्या आहेत.
रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण
जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये बोरिवली, दहिसर, मीरा-भाईंदर, नालासोपारा येथून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र वैद्यकीय विभागामध्ये डॉक्टरच नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत, अनेक रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये हलविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत.
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे…
वैद्यकीय विभाग सुरळीत सुरू असून, डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्याकडे दोन प्राध्यापक, एक वरिष्ठ निवासी डॉक्टर, आणि दोन सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे आम्ही रुग्णांना दाखल करून घेण्याचे प्रमाण कमी केले होते, अशी माहिती रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
