मुंबई : बदलापूर येथे उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप असलेले माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनावर २९ ऑगस्ट रोजी तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कल्याण सत्र न्यायालयाला दिले. तसेच, म्हात्रे यांच्या अर्जावर त्याच दिवशी निर्णय घेण्याचे बजावले. 

अर्जावर तातडीने सुनावणी न घेण्याच्या कल्याण सत्र न्यायालयाच्या कार्यपध्दतीवरही उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न संबंधित असतो तेव्हा न्यायालयाने अशी प्रकरणे तातडीने सुनावणीस घ्यावीत, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नाराजी व्यक्त करताना केली.

हेही वाचा >>>दृष्टीहीन तरुण-तरुणींचे मानवी मनोरे ठरले लक्षवेधी; नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची शानदार सलामी

आपण २२ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, कल्याण न्यायालयाने अद्याप आपल्या अर्जावर सुनावणी घेतलेली नाही. शिवाय, अर्जावर निर्णय दिला जाईपर्यंत आपल्याला अटकेपासून अंतरिम सरंक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावरही, न्यायालयाने निर्णय दिलेला नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या म्हात्रे यांच्यातर्फे करण्यात आला. त्याची न्यायालयाने दाखल घेतली व उपरोक्त आदेश दिले.

हेही वाचा >>>राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचा काढणार विमा

वार्तांकन करताना म्हात्रे आणि त्या महिला पत्रकाराची बाचाबाची झाली. ‘तू अशा बातम्या करत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे वक्तव्य म्हात्रे यांनी केले. विनयभंगाचा हा प्रकार असल्याकारणाने त्या पत्रकाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर २७ तासांनंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे न देता तो आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी महिला पत्रकाराचा जबाब सहाय्यक पोलीस आयुक्तांनी नोंदवून घेतला. त्यानंतर, अटकेच्या भीतीमुळे आरोपी म्हात्रे यांनी जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात केला होता. परंतु, त्यावर सुनावणी न झाल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.