सामान्यांचे प्रवास हाल कायम

सरकारी तसेच खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवल्यामुळे तसेच दुकानांची वेळ वाढवल्याने बेस्ट, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

कार्यालयीन उपस्थिती पूर्ण क्षमतेने, रस्ते वाहतुकीवर ताण; बेस्ट, मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

मुंबई : सरकारी तसेच खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवल्यामुळे तसेच दुकानांची वेळ वाढवल्याने बेस्ट, मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. लोकल गाडय़ांनाही काहीशी गर्दी वाढली असली तरीही अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्यास परवानगी असल्याने सामान्यांना रस्ते वाहतुकीशिवाय अद्यापही पर्याय नाही. बस थांब्यावर लांबच लांब रागा, बसमध्ये आसन उपलब्ध न होणे, वाहतूक कोंडीमुळे त्यांचे हाल कायमच राहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कर्जत, कसारा, बोरिवली, दहिसर येथून मुंबईतील कार्यालये गाठण्यासाठी मोठी कसरतही करावी लागत आहे.

यापूर्वी कार्यालयात ५० टक्के च उपस्थितीसाठी परवानगी होती. निर्बंध शिथिल करताना मंगळवारपासून सरकारी आणि खासगी कार्यालये सर्व मनुष्यबळासह सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई पालिकेने दुकाने दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, तरीही सामान्य प्रवाशांना अद्यापही लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असल्याने सामान्यांची बेस्ट बस थांब्यावर गर्दी वाढू लागली आहे. सकाळी व सायंकाळी थांब्यावर रांगाच रांगा लागत आहेत. त्यात वाढ झाल्याने बस पकडताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. त्यातच उभ्याने प्रवासी घेण्याची परवानगी नसल्याने आसन पकडण्यासाठी घाई होत आहे.

बसमधील सर्व आसने भरलेली असल्याने मधल्या थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेशच मिळत नाही. त्यामुळे बस मिळवण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याचे दिसते आहे.

प्रवाशांच्या संख्येत वाढ

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी संख्येत वाढ झाल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली. २९ जुलैला २२ लाख ९८ हजार प्रवासी होती. ३ ऑगस्टला २३ लाख ३६ हजार प्रवासी झाल्याचे सांगण्यात आले. मेट्रो प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. २९ जुलै आणि ३० जुलैला घाटकोपर ते वसरेवा मेट्रोमधून दिवसाला ८३ हजार प्रवासी प्रवास करत होते. २ ऑगस्टपासून हीच संख्या ८७ हजार झाल्याची माहिती मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आली. सध्या दिवसाला १८२ फे ऱ्या मेट्रोच्या होतात. प्रवासी संख्या आणखी वाढल्यास फे ऱ्या वाढवण्याचे नियोजन के ले जाईल, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.

लोकल गाडय़ांनाही गर्दी वाढली

सरकारी कार्यालयातही उपस्थिती वाढवण्यात आल्याने लोकल गाडय़ांनाही गर्दी वाढली आहे. गर्दीच्या वेळी तिकीट खिडक्यांसमोरही रांगाच दिसत आहेत. एटीव्हीएम, मोबाइल अ‍ॅप, जनसाधारण तिकीट सेवा नसल्याने तिकीट खिडक्यांसमोर मोठय़ा रांगा लागत आहेत. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर २९ आणि ३० जुलैला ९ ते १० लाख प्रवासी प्रवास करत होते. ३ ऑगस्टला हीच संख्या १४  लाखांपर्यंत पोहोचली आहे. पश्चिम रेल्वेवरही सात ते आठ लाखांदरम्यान असलेली प्रवासी संख्या ३ ऑगस्टला ११ लाख २५ हजारापर्यंत गेली आहे.

वाहतूक कोंडीचा फटका

मेट्रो तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामे यांमुळे सकाळी तसेच सायंकाळी मुंबई शहर व उपनगरात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. लोकलचा पर्याय सामान्यांना नसल्याने खासगी कार्यालय गाठणारे कर्मचारी तसेच दुकानदार व अन्य कामगार, कर्मचारी वर्ग बेस्ट, रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशीर होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Journey common man continues best railways metro ssh

ताज्या बातम्या