मुंबई : मराठी नाटय़सृष्टी, रंगभूमीच्या इतिहासाचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना मनात होती, आता ती लवकरच मराठी नाटय़विश्व इमारतीच्या रूपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून ‘मराठी नाटय़ विश्व’ ही नाटय़गृह व मराठी रंगभूमी संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्यासह  दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

नाटय़सृष्टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर  बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारे माध्यम आहे. त्यामुळे मराठी नाटय़सृष्टीचा इतिहास सांगणारी मराठी नाटय़विश्वाची इमारत    साकारणार आहे, याचा आनंद होत असल्याचे सांगून ठाकरे  म्हणाले, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे  मनात काही काळापासून नाटय़ संग्रहालयाची कल्पना होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. चहल यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी नाटय़विश्वाची वैशिष्टय़े सांगितली. सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर  ‘मराठी नाटय़विश्व’ या नावाने नाटय़गृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.