मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जुहू समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी पहाटे ‘सी, शोर, शाईन-२०२६’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापिका, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता अजय देवगण, शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे स्वयंसेवक आदी सहभागी झाले होते. तसेच, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेतून सुमारे ३४ टन कचरा संकलित करण्यात आला.
दिव्याज फाउंडेशन, महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मेघा श्रेय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी, शोर, शाईन-२०२६’ ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जुहू समुद्रकिनाऱ्यावरून गणेश विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यातील फुले स्वतंत्र करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून अगरबत्ती तसेच अन्य उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येणार आहेत.
उत्सवानंतर शहर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून अविरतपणे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी, तसेच आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असे आवाहन दिव्याज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांनी केले. जसे आपले आपल्या घरावर प्रेम असते आणि आपण ते स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपण ज्या शहरात राहतो ते शहर आणि आपला देश स्वच्छ व सुंदर ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, असे अभिनेता अजय देवगण म्हणाले.
महानगरपालिकेने केलेल्या विविध प्रयत्नांमुळे यंदा मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. आगामी काळात प्रक्रिया केलेले पाणीच समुद्रात सोडण्याच्या दिशेने प्रयत्न होत असून, यामुळे समुद्र अधिक स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल, असे आमदार अमित साटम यांनी नमूद केले. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिव्याज फाउंडेशनच्या सामाजिक व स्वच्छता विषयक उपक्रमांचे कौतुक केले.
समुद्र ही मुंबईची मोठी संपत्ती आहे. आपण कचरा किंवा प्लास्टिक फेकल्यास समुद्र आणि समुद्रकिनारे अस्वच्छ होतात. उत्सवानंतरही स्वच्छतेची भावना कायम ठेवत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याचे तसेच समुद्रकिनारे स्वच्छ राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. त्यावेळी आमदार राम कदम, स्थानिक नगरसेविका सीमा सिंग, सह आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले आदी उपस्थित होते.
