कुलदीप घायवट

मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यापाठोपाठच आता गिरगाव चौपाटीवरही जेलिफिशसदृश्य ‘ब्लू बॉटल’ दिसू लागले असून समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने ‘ब्लू बॉटल’ आल्यामुळे पर्यटक धास्तावले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर जुलै महिन्यात ‘ब्लू बॉटल’ आढळले होते. त्यामुळे जुहू समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. गिरगाव चौपटीवर ९ ऑगस्ट रोजी ‘ब्लू बॉटल’ आढळले आहेत. समुद्राच्या लाटांसोबत तरंगत ‘ब्लू बॉटल’ किनाऱ्यावर येतात. सध्या चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’ विखुरलेले आहेत, असे जीवरक्षकांकडून सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून पाऊस कोसळू लागला असून वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर जात आहेत. पर्यटकांना ‘ब्लू बॉटल’चा दंश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी फिरू नये, वाळूमध्ये बसू नये, असे आवाहन मरिन लाइफ ऑफ मुंबई या संस्थेकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी ‘ब्लू बॉटल’च्या दंशामुळे अनेक गणेशभक्त जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चौपाटीवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’ आल्यामुळे कोणती खबरदारी घ्यायची याबाबतचे फलकही लावण्यात आले होते. मात्र यंदा तशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे मत सागरी परिसंस्था अभ्यासकांनी व्यक्त केले. ‘ब्लू बॉटल’ पारदर्शक फुग्यासारखा भाग असतो. त्याखाली निळ्या रंगाचे धाग्यासारखे शुंडक असतात. या शुंडकांना स्पर्श झाल्यास दंश होतो. हा दंश अत्यंत वेदनादायी असतो. तत्काळ उपचार घेतल्यास दंश झालेला भाग लवकर बरा होतो.