मुंबई : अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीएमडब्ल्यू चालक महिलेने चक्क वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना जुहू येथे घडली. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी हस्तक्षेप करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही महिला थांबली नाही. याप्रकरणी जुहू पोलिसांनी महिलेची ओळख पटवली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जुहू परिसरात शुक्रवारी रात्री संबंधित महिलेच्या बीएमडब्ल्यू मोटारगाडीची अन्य एका वाहनाला धडक बसली. अपघातानंतर महिला घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तिला रोखण्यासाठी मोटारगाडीसमोर उभे राहून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक पोलिसाने गाडीवर हाताने ठोठावून थांबण्याचे संकेत देऊनही महिलेने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे वाहतूक पोलिसाचा जीव धोक्यात आला. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही गाडीच्या काचा ठोठावून महिलेला गाडी थांबविण्याचे आवाहन केले.
वाहतूक पोलिसाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी महिलेच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, तिने नागरिकांच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष केले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड वायरल होत असून नागरिकांकडून महिलेवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, संबंधित महिलेची ओळख पटली असून वाहतूक पोलिसाच्या तक्रारीनुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच, घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
बेजबाबदार वाहनचालकांचा मुंबईकरांना धोका
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्ते अपघातांनंतर वाहनचालकांकडून घटनास्थळी न थांबता पळ काढण्याचे प्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. अपघात झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळी थांबून जखमींची मदत करणे आणि पोलिसांना माहिती देणे अपेक्षित असते. मात्र, कारवाईच्या भीतीने घटनास्थळावरून पळ काढण्याचे प्रकार घडतात. वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमुळे आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांना अशा बेजबाबदार वाहनचालकांचाही सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
