मुंबई : वाहतूक पोलिसाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जुही मेहता या महिलेची बीएमडब्ल्यू मोटार जुहू पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच तिचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) विनंती करण्यात आली आहे. विलेपार्ले पश्चिम येथील संगीत महाभारती जंक्शनवर ३० ऑक्टोबरला रात्री बीएमडब्ल्यू आणि मारुती वॅगनआर यांच्यात झालेल्या धडकेनंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी जुहू पोलिसांनी मेहता यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांची रोख जामिनावर सुटका केली आहे.

जुही मेहता या एका डिजिटल माध्यम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ३० ऑक्टोबरला रात्री ८.३० च्या सुमारास विलेपार्ले पश्चिम येथील एन. एस. मार्ग क्रमांक १० वरील प्रतीक्षा बंगल्यासमोर, संगीत महाभारती जंक्शनजवळ बीएमडब्ल्यू आणि मारुती वॅगनआर यांच्यात किरकोळ धडक झाली. त्यामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी थांबल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

त्यावेळी सांताक्रूझ वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रशांत गोकुळ हाके (३६) वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. त्यांनी दोन्ही वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. प्रशांत हाके मोटारीसमोर उभे राहून वाहन थांबविण्याची सूचना करीत असतानाही मेहता यांनी मोटार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हाके यांना बाजूला होऊन स्वतःचा बचाव करावा लागला. त्यानंतर मेहता मोटार घेऊन जे. व्ही. पी. डी. जंक्शनच्या दिशेने निघून गेल्या. या घटनेचा व्हिडीओही चित्रित करण्यात आला होता.

जामिनावर सुटका

या प्रकरणी जुहू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. सार्वजनिक सेवकांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर, जीवितास धोका निर्माण करणारी कृती, धमकी आणि धोकादायक वाहन चालवणे या आरोपांशी संबंधित ही कलमे आहेत. मेहता यांना अटक करून अंधेरीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रोख जामिनावर

सुटका केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी बीएमडब्ल्यू जप्त केली आहे. मेहता यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विनंती करण्यात आली आहे. या विनंतीवर कार्यालयाकडून कोणता निर्णय घेण्यात आला, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.