मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या कोळीवाड्यांना अनेक वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. त्यापैकीच एक असलेला जुहू कोळीवाडा धनधांडग्यांच्या वस्तीत आपले अस्तित्त्व जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कोळीवाड्याचा पूर्वीचा बाज पुरता उतरला आहे. परप्रांतीयांच्या झोपड्यांनी अर्धा अधिक भाग व्यापला गेला आहे. बहुतांश सर्वच कोळीवाड्यात ही समस्या आहे. मात्र तरीही आपला पारंपारिक वारसा जपण्याची धडपड हा कोळी समाज करीत आहे. मात्र शासनाकडून साथ मिळत नाही, अशी त्यांची खंत आहे.

‘महिकावती’च्या बखरीत जुहूचा उल्लेख स्वतंत्र बेट म्हणून आहे. राजा प्रताप बिंबाच्या काळातही (बाराव्या शतकात) या बेटावर कोळी समुदायाची छोटी वसाहत होती. पोर्तुगीजांनी या परिसराला ‘जुवेम’ हे नाव दिले होते. त्याचाच अपभ्रंश ‘जुहू’ असा झाला असावा. एकीकडे भंडारी, मीठ व्यापारी आणि कुणबी (लागवड करणारे) व दक्षिण बाजूस वांद्रे बेटाच्या समोरील भागात मासेमारी करणारे व शेती करणाऱ्यांच्या (कोळीवाडे) छोट्या वसाहती होत्या. जुहूतील रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. हाच तो जुहू तारा रोडवरील प्राचीन कोळीवाडा.

समुद्र किनाऱ्याला समांतर धनदांडग्यांचे बंगले (त्यापैकी एका भूखंडावर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निवासस्थान) आहेत तर जुहू तारा रोडवरुन डावीकडे चिंचोळ्या रस्त्याने पुढे गेल्यावर मूळ जुहू गावठाण आहे. जुहू तारा रोडवरुन पूर्वीच्या न्यू लिडो चित्रपटगृहाशेजारी असलेल्या छोट्या गल्लीपर्यंत मूळ कोळीवाडा वसला आहे. २०१८ मध्ये या कोळीवाड्याचे सीमांकन झाले. जुहूच्या विस्तारीत गावठाणाचेही सीमांकन केले गेले. परंतु ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. कोळी बांधवांनी माहिती अधिकारात या सीमांकनाचे नकाशे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. आता आठ वर्षे होऊन गेली तरी शासनाकडून काहीच हालचाल होत नसल्यामुळे ही मंडळी अस्वस्थ असल्याचे जाणवते. समुद्रकिनारी बंगले, आलिशान इमारती अन् लाखाच्या घरात प्रति चौरस फुटाचा दर, अशा धनदांडग्यांच्या वस्तीत वसलेला कोळीवाडा अस्तित्त्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. विस्तारीत गावठाणाची जागा खरेतर या कोळीवाड्यांचीच. परंतु तेथे परप्रांतीयांनी झोपड्या बांधून बेसुमार अतिक्रमण केले आहे. राजकीय पक्षांकडूनही मतपेटी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोळीवाड्याच्या अस्तित्त्वालाच मात्र तडा गेला आहे.

मूळ कोळीवाड्यात सुरुवातीला शंभरहून अधिक घरे होती. घरांच्या अवतीभोवती मोकळी जागा होती. तिसरी ते चौथी पिढी आता वास्तव्याला आहे. आता ही संख्या तीन ते साडेतीन हजारच्या घरात पोहोचली आहे. कुटुंब वाढल्याने अतिरिक्त बांधकाम करण्याशिवाय या कोळी बांधवांना पर्याय उरला नाही. त्यामुळेच कोळीवाड्याला बकाल स्वरुप आले हे कोळी बांधवही मान्य करतात. १४ फुट उंचीपेक्षा अधिक बांधकाम केल्याच्या नोटिसा या कोळी बांधवांनाही आल्या आहेत. आम्ही आद्य नागरिक असूनही आम्हाला झोपडीवासीयांसारखी वागणूक दिली जात असल्याची खंत काही कोळी बांधवांना बोलून दाखविली. १९९१ च्या विकास नियंत्रण आराखड्यात कोळ्यांची घरे व त्यांची मासळी सुकविण्याची जागा स्पष्टपणे दाखविली आहे. २०३४ च्या विकास आराखड्यातही ही जागा स्पष्टपणे दिसते. मूळ कोळीवाडा/ गावठाणातील घरेही आराखड्यात दिसतात. मात्र ती आता फक्त जुहू तारा रोडपर्यंत मर्यादीत राहिली आहे.

या कोळीवाड्यात ईस्ट इंडियन जमातीचे कुणी आढळून येत नाही. परंतु गोवन ख्रिश्चन मात्र बऱ्यापैकी आहेत. १८६८ मध्ये या ख्रिस्ती बांधवांना प्रार्थना करता यावी, यासाठी छोटा क्रॅास उभारण्यात आला होता. आता तेथे होली क्रॅास चर्च उभे आहे. मढमधील ईस्ट इंडियन जमातीला त्यांचे भवन बांधण्यासाठी भूखंड देण्यात आला. मात्र कोळी भवनांची मागणी शासनाकडून पूर्ण करण्यात आलेली नाही. आता शासनाकडून मढ येथे भूखंड देण्याचे प्रस्तावित आहे. परंतु तूर्तास तरी हातात काही नाही, असे या कोळी समाजाचे म्हणणे आहे.

या कोळीवाड्यातील सर्वात जुने विठ्ठल रखुमाई मंदिर हे १९३० मध्ये बांधण्यात आले होते. याआधीपासून अस्तित्त्वात असलेल्या या कोळीवाड्यालाही दीडशे ते दोनशे वर्षांची परंपरा असल्याचे अधोरेखित होते. आषाढी व कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारिक पद्धतीने साजरा होतो. दिंढ्याही निघतात. पालखीही काढली जाते. चार ते पाच हजार नागरिक या उत्सवात आवर्जून सहभागी होतात, असे जुहू तारा मत्स्योद्योग सहकारी संस्थेचे अध्यक्ष वसंत थोटी यांनी सांगितले.

कोळीवाड्याच्या हद्दीच्या प्रत्येक टोकावर एक मंदिर आहे. जुहू कोळीवाड्याची ग्रामदेवता असलेली गावदेवी मात्र इस्कॅान मंदिराजवळ आहे. देवी वाघावरुन जुहू कोळीवाड्यात यायची व वाघाला ज्या ठिकाणी बांधायची ते तारेश्वर मंदिर. वाघाला बांधून अख्ख्या गावात देवी फेरफटका मारायची, अशी आख्यायिका आजही गावातील जुनी मंडळी सांगतात. गावदेवीचे स्थान पाहिले तर कोळीवाड्याची हद्द पूर्वी कुठपर्यंत असेल याची कल्पना यावी. रमाडा इन हॅाटेलपर्यंत जुहू कोळीवाडा होता, असेही काही जुनेजाणते सांगतात. काकडदेवीचे मंदिरही आहे. तिचे मानपान आजही केले जाते. होळीचा उत्सव इतर कोळीवाड्यांप्रमाणे येथेही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. परंतु गणेश मंदिरात संपूर्ण जुहू कोळीवाड्याचा एकच गणेशोत्सव ११ दिवस साजरा होतो. आता या कोळीवाड्यात परप्रातींयांकडूनही दोन-तीन गणेशोत्सव डीजेच्या गजबजाटात साजरे केले जातात. एकीकडे आम्ही आमचा पारंपारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु या घुसखोरांनी कोळीवाड्याची पार वाट लावून टाकल्याची खंतही हे कोळी बांधव व्यक्त करतात.

जुहू कोळीवाड्याशेजारीच खारदांड्याचा कोळीवाडा आहे. मध्ये फक्त खाडी आहे. खाडी ओलांडण्यासाठी एक कच्चा पूल आहे. कोळीवाड्याच्या डावीकडे थेट दक्षिणेपर्यत तिवरांचे दाट जंगल होते. खाडीचे पाणी घरांपर्यंत यायचे. समुद्राला भरती यायची तेव्हा खाडीचे व समुद्राचे पाणी एकमेकांत मिसळल्याने मोठ्या बोटीही सहज यायच्या. आता खाडीला पाणीच नाही. तिवरांचे जंगल तोडून बेसुमार अतिक्रमणे होत आहे. भरतीही आटली आहे. सागरी सेतुमुळे मासेमारीवरही मोठा परिणाम झाला आहे, असे जुहू तारा कोळी जमातीचे अध्यक्ष अनिश गावडे सांगतात.

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुचे काम सध्या जोरात सुरु आहे. परंतु या सेतुमुळे खारदांडा, जुहू तारा आणि मोरागाव या कोळीवाड्यांना जो फटका बसणार आहे, त्याचा विचारच केला गेलेला नाही. आज गावात ४०-४५ छोट्या बोटी आहेत. दोन किलोमीटरच्या परिसरात त्या मासेमारी करतात. ९०० मीटरचा किनारा सागरी सेतुमुळे नष्ट झाला आहे. उर्वरित भागात मासे मिळणे मुश्किल झाले आहे. अशा वेळी आम्हाला नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु तुटपुंज्या नुकसानभरपाईवर आमची बोळवण करण्याचा शासनाचा विचार दिसतो. किमान कोळी जमातीची जागा आम्हाला द्यावी म्हणजे आम्ही काही व्यवसाय सुरु करुन आमचा उदरनिर्वाह करु शकू. या जागेचे भाडेही आम्ही भरतो. जिल्हाधिकारी कार्यालयाने मध्यंतरी भाडे थांबवले होते. परंतु ते आता पुन्हा सुरु झाले आहे, असे गावडे म्हणाले.

पूर्वी आमच्या अनेकांच्या खळ्या होत्या. त्यावर आम्ही मासे सुकवायचो. बोंबील सुकविण्यासाठीही बांबूचे लावंड होते. समुद्रात मासेच मिळणे कमी झाल्याने आमच्या या पद्धतीला खीळ बसली आहे, अशी आठवण बुजुर्ग नागरिक जनार्दन थोटी सांगतात. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुचे काम सध्या जोरात सुरु आहे.परंतु या सेतुमुळे खारदांडा, जुहू तारा आणि मोरागाव या कोळीवाड्यांना जो फटका बसणार आहे, त्याचा विचारच केला गेलेला नाही. सागरी सेतुचे काम सुरु झाले तेव्हा कोळी समाजासाठी राखीव असलेला मोठा भूखंड राज्य रस्ते विकास महामंडळाने संपादित करण्यास सुरुवात केली होती. परंतु आम्ही जोरदार विरोध केला. अगदी न्यायालयात दाद मागितली. पर्यावरणतज्ज्ञ जोरु बाथना, ॲड. गायत्री सिंग यांनी आमची बाजू लावून धरली. त्यामुळे आम्ही भूखंड वाचवू शकलो, असेही गावडे यांनी निदर्शनास आणले. सर्वांची कोळीवाड्यात असलेल्या मोकळ्या भूखंडावर नजर आहे. परंतु हे मोकळे भूखंड कोळी समाजाला दिले होते. ते तरी हिसकावून घेऊ नका, अशी विनंतीही ते करतात.

कोळीवाड्यांचा मसुदा जाहीर करा…

कोळीवाड्याबाबत शासनाला खरोखरच कणव असेल तर त्यांनी कोळीवाडे-गावठाण समितीच्या वतीने शासनाला सादर केलेला नियमावलीचा मसुदा लागू करावा. बकाल झालेल्या कोळीवाड्याचे पारंपारिक रुप व वारसा जपायची इच्छा असेल तर नियंत्रित पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही. उत्तुंग इमारती हा उपाय असू शकत नाही, असे अर्बन सेंटरचे प्रधान संचालक पंकज जोशी यांनी सांगितले. यासाठी अर्बन सेंटरने पुढाकार घेऊन सर्व कोळीवाडे-गावठाणातील समस्यांचा अभ्यास केल्यानंतर नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. त्याची अमलबजावणी केली तर नक्कीच कोळीवाड्यांचा वारसा आपण जपू शकू, असे जोशी यांना वाटते.

nishant.sarvankar@expressindia.com