मुंबई : करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे मुंबई महापालिकेने दहिसर, नेस्को आणि कांजूर येथील जम्बो करोना केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर करोना केंद्रांतील औषधे, साधनसामग्री आणि उपकरणे मागणीनुसार संबंधित रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. करोनाबाधित रुग्ण दाखल असलेल्या केंद्रात महिन्याभराचा, तर रुग्ण नसलेल्या केंद्रांत आठवडय़ाचा औषध साठा उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित साठा रुग्णालयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागताच पालिकेने करोना काळजी केंद्रे, समर्पित करोना आरोग्य केंद्रे, जम्बो केंद्रे सुरू केली. मोठय़ा संख्येने रुग्ण तेथे दाखल होत होते. मुंबईत तिसरी लाट ओसरल्यानंतर करोना केंद्रे ओस पडू लागली. त्यामुळे प्रशासनाने बहुतांश करोना केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला.
आता दहिसर, नेस्को आणि कांजूर येथील अनुक्रमे ८०० खाटा, २२०० खाटा आणि १६०० खाटा क्षमता असलेली जम्बो करोना केंद्रेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जम्बो करोना केंद्रांमध्ये आवराआवर सुरू झाली आहे. केंद्रांतील आवश्यक बाबी रुग्णालयांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या जम्बो केंद्रांसह विविध ठिकाणच्या केंद्रांमध्ये औषधांचा साठा उपलब्ध आहे. काही औषधे कालबाह्य होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कार्यान्वित करोना केंद्रांतील औषधसाठा आवश्यकतेनुसार रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या काही करोना केंद्रांमध्ये अत्यंत तुरळक संख्येने रुग्ण दाखल आहेत. अशा करोना केंद्रांमध्ये रुग्णांना महिनाभर पुरतील इतका औषध साठा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण नसलेल्या करोना केंद्रांमध्ये केवळ आठवडाभराचा औषधसाठा उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुळात या केंद्रांसाठी गरजेनुसार औषधे खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे कालबाह्य होऊन मोठय़ा संख्येने औषधे वाया जाण्याची शक्यता नाही. असे असले तरी उपलब्ध औषधांचा वापर व्हावा, ती वाया जाऊ नयेत म्हणून रुग्णालयांना उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ औषधेच नाही तर बंद करण्यात येणाऱ्या करोना केंद्रांमधील खाटा, अन्य साधनसामग्री आणि उपकरणेही गरजेनुसार रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. अशा तब्बल सहा हजारांहून अधिक खाटा आहेत. मागणीनुसार यापैकी काही खाटा लवकरच केईएम रुग्णालयाला उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लवकरच दहिसर, नेस्को आणि कांजूर येथील जम्बो करोना केंद्रे बंद करण्यात येणार आहे. तसेच बंद केंद्रांमधील औषधे, साधनसामग्री आणि उपकरणे मागणीनुसार रुग्णालयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या औषधांचा वापर होऊ शकेल.-सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त