मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई केलेल्या कारवाईत नेव्हल ऑफिसर्स रेसिडेन्शिअल एरिया (नोफ्रा) येथे कार्यरत कनिष्ठ अभियंत्याला साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी आरोपीला विशेष न्यायालयाने ९ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. याप्रकरणी ईडीने मुंबई व उत्तराखंड येथील आरोपीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करीत आहेत

डी. सी. पांडे असे अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तो मुंबईतील नोफ्रामध्ये कार्यरत होता. सीबीआयने गुरूवारी सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लेखी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये आरोपी अभियंत्याने तक्रारदाराच्या कंपनीच्या प्रलंबित पावत्या मंजूर करून देण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे नमूद होते. चर्चा व तडजोडीअंती आरोपीने याप्रकरणी साडेचार लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली. त्याची सीबीआयकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने ५ जूनला अभियंत्याला सापळा रचून लाच स्वीकारताना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी आरोपीला मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईनंतर सीबीआयने आरोपीच्या मुंबई व रुडकी येथील ठिकाणांवर छापे टाकले. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करीत आहे.