मानवी हक्कांच्या लढय़ातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल निवृत्त न्यायमूर्ती हॉस्बेट सुरेश यांना दुसरा ‘डॉक्टर असगर अली इंजीनिअर स्मृती जीवनगौरव पुरस्कार’ मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. रुपये २५ हजार रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

न्या. हॉस्बेट यांनी वंचित समाजाच्या घटनात्मक हक्कांची पायमल्ली करणाऱ्या अनेक प्रकरणांतील अहवालांचे, सत्य आणि साक्षींचे अतिशय दक्षतेने संकलन केले. त्यातील उतारे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात उद्धृत केले जातात. कावेरी नदीच्या पाण्यावरून झालेली बंगळूरु दंगल (१९९१), बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उद्भवलेल्या दंगली (१९९३), मुंबईतील पदपथ आणि झोपडपट्टीवासीयांची घरे उद्ध्वस्त होणे (१९९५) या प्रकरणांमधील जनसुनावणीचे नेतृत्व न्या. हॉस्बेट यांनी केले. पूर्व किनाऱ्यांवर कोळंबीचे उत्पादन न घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणातील (१९९५) कोळंबीच्या शेतीने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलचे दस्तावेजीकरण त्यांनी केले.

तमिळनाडू पोलिसांनी दलितांवर केलेला अन्याय (१९९९), मध्य प्रदेशातील आदिवासींवर झालेला गोळीबार (१९९९), गुजरात दंगल (२००२) या प्रकरणांसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीतही न्या. हॉस्बेट यांचा सहभाग होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना आणि निवृत्तीनंतरची तीस वर्षे ते सामाजिक संस्थांनी न्याय्यहक्कांसाठी उभारलेल्या लढय़ात निर्भयपणे सहभागी झाले. आयुष्यभर त्यांनी विवेक आणि सत्याची कास धरली.