मुंबई : सरकारवर टीका करणे आणि देशावर प्रेम करणे या दोन परस्परविरोधी गोष्टी नाहीत. लोकशाहीत सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याचा आणि असहमती व्यक्त करण्याचा अधिकार तरुणांना असलाच पाहिजे. मात्र टीकेसोबत देश उभारणीसाठी विधायक सूचना आणि कृतीही आवश्यक आहे, असे प्रतिपादन करत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तरुणांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव बुधवारी करून दिली. जेन झीच्या आंदोलनात पंतप्रधानाविषयी वापरण्यात आलेल्या भाषेविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आयआयएमयूएनच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंदे यांनी तरुणांच्या प्रश्नांवर राजकीय नेतृत्वाने अधिक संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. ध्रुव अगरवाल यांनी शिंदे यांची मुलाखत घेतली. आयआयएमयूएनचे भारताच्या लोकसंख्येपैकी जवळपास ७० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. भविष्यात केवळ आर्थिक क्षमता नव्हे, तर कल्पकता, कौशल्य आणि नवोन्मेषाच्या जोरावर भारताची जागतिक ओळख ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले.
‘‘देशावर प्रेम करणे आणि सरकारच्या धोरणांवर टीका करणे हे परस्परविरोधी नाही. एखाद्या घटनेचे केवळ विश्लेषण अथवा ‘पोस्टमार्टेम’ करण्यापेक्षा त्यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करून सांगितले.
वय, जात, धर्मापलीकडे संवाद हवा
संवाद हा कोणत्याही वय, जात, धर्म किंवा विचारसरणीच्या चौकटीत मर्यादित राहता कामा नये. समाजाला ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ अशा पिढ्यांमध्ये विभागण्याची गरज नाही. प्रत्येक पिढीकडे शिकण्यासारखे काहीतरी असते, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिक्षणावरील खर्च आणि उपलब्ध सुविधांपेक्षा त्यातून निर्माण होणारे परिणाम महत्त्वाचे आहे. केवळ परीक्षाकेंद्रित शिक्षणाऐवजी प्रत्यक्ष उपयुक्ततेवर आधारित शिक्षणावर भर देण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली.
५जीच्या दिशेने वाटचाल
दूरसंचार क्षेत्रात भारताने स्वदेशी ४जी तंत्रज्ञान विकसित केले असून आता देशांतर्गत ५जी तंत्रज्ञानाच्या दिशेने काम सुरू आहे. भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) जाळे अधिक मजबूत करून खासगी कंपन्यांशी प्रभावी स्पर्धा करण्यास सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
