मुंबई: राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात, हे लक्षात घेवून भीमाशंकर,औंढा नागनाथ व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडयाची प्रभावी अंमलबजावणी करा तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व भविष्यातील संख्यानुसार दर्शन रांगांचे नियोजन करण्याचे आदेश देताना, फडणवीस यांनी यात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेवून मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष,पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्कींग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्योतिर्लिंगं परिसरात पायाभूत सुविधांची कामे गतीमान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी. यासाठी खबरदारी घेण्यात यावी. अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा.जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
