सुपरस्टार अभिनेता रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कबाली’ला मुंबईतील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. माटुंग्यातील अरोरा टॉकीजमध्ये या चित्रपटाच्या सकाळी सहा वाजता झालेल्या पहिल्या शोला इतिहासात पहिल्यांदाच हाऊसफुल्ल गर्दी होती. एवढंच नाहीतर अनेक प्रेक्षकांनी पडद्यावर रजनीकांत दिसताक्षणीच स्वतःकडील पाचशे रुपयांच्या नोटा पडद्यावर उधळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
वाचा : रजनीकांतने चाहत्यांसोबत पाहिला ‘कबाली’
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण दक्षिण भारतात कबालीचीच हवा आहे. ‘कबाली’च्या प्रदर्शनानिमित्त दक्षिणेतील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी शुक्रवारी सुटी जाहीर केली आहे. मुंबईमध्ये माटुंग्यातील अरोरा टॉकीजमध्ये कबालीचे सकाळी सहापासून शो लावण्यात आले आहेत. सकाळीच्या सहाच्या शोला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपटाचा पहिला शो सकाळी सव्वा आठ वाजता लावण्यात आला होता. पण हा शो हाऊसफुल्ल झाला नव्हता. यावरूनच मुंबईमध्येही रजनीकांतचे चाहते किती मोठ्या प्रमाणात आहेत, हे दिसून आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या शो सुरू झाल्यावर रजनीकांत पडद्यावर दिसताक्षणीच चाहत्यांनी जल्लोष केला. काही जणांनी पडद्यापुढील मोकळ्या जागेत जाऊन स्वतःजवळील पाचशे रुपयांच्या नोटा रजनीकांतवर उधळल्या.
वाचा : प्रदर्शनापूर्वीच रजनीकांतचा ‘कबाली’ लीक
दरम्यान, चाहत्यांचे बेसुमार प्रेम पाहून अमेरिकेतील ‘सॅन फ्रॅन्सिस्को’ शहरातील काही भाग्यवान चाहत्यांसाठी चित्रपटाचे ‘स्पेशल स्क्रिनिंग’ करण्याचे योजले. अमेरिकेतील प्रेक्षकांनी ‘थलाइवा रजनी’च्या या चित्रपटाबद्दल ‘पैसा वसूल, अंगावर शहारे आणणारा’ चित्रपट अशा शब्दांत प्रतिक्रिया देत आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद देत व्यक्त झाले. पायरसीमुळे ‘कबाली’च्या कमाईत तिळमात्रही फरक पडताना दिसत नसून याउलट ‘सुलतान’ आणि ‘बाहुबली’ या सुपरहीट चित्रपटांचे विक्रम रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट मोडीत काढणार असा दावा चित्रपट निर्मात्यांनी केला आहे.