मुंबई : मुंबई शहरातील कला जगतात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या ‘काळा घोडा कला महोत्सवाला’ (आर्ट फेस्टिव्हल) शनिवारपासून सुरुवात झाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभरातील पारंपरिक वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री, शंभरहून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन आदींचा महोत्सवात समावेश आहे यामुळे दक्षिण मुंबईला सध्या उत्सवाचे रूप आले असून यामुळे तरुण कलाप्रेमींसह परदेशी नागरिकांचीही मांदियाळी या उत्सवात दिसून येत आहे. यात मुंबई शहराचे वैशिष्ट्य सांगणारे ‘रेड हार्ट’ आकर्षणचा विषय ठरत असून त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी कलाप्रेमी गर्दी करीत आहेत.
यंदाच्या कलाकृतींमध्ये प्रामुख्याने भौमितिक रचनांना महत्त्व देण्यात आले आहे. महोत्सवाचे प्रवेशद्वारही भौमितिक रचनांनुसारच साकारण्यात आले असून त्यावर आपल्याला भौमितिक आकार पाहायला मिळतात. तसेच भौमितिक आकारांपासून घोडे तयार करण्यात आले आहेत. हे प्रवेशद्वार साकारण्यासाठी लाकूड, कापड आणि कॅनव्हास तसेच रंगीत पाण्याच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. छोट्याशा कंपास बॉक्समध्ये विविध आकाराच्या वस्तू एकत्र असतात. तसेच समाजातही विविध विचार सरणीची, स्वभावाची माणसे असतात, त्यांनी मतभेद बाजूला सारून समाज म्हणून एकत्र यायला हवे हा संदेश त्यातून देण्यात आला आहे, असे हे प्रवेशद्वार साकारणाऱ्या सुमित पाटील यांनी सांगितले.
मुंबई शहराचे वैशिष्ट्य सांगणारे ‘रेड हार्ट’ काय ?
काळा घोडा कला महोत्सवात मुंबई शहराचे वैशिष्ट्य सांगणारे ‘रेड हार्ट’ साकारण्यात आले आहे. मुंबई शहरातील अनेक व्यवसाय आणि अनेक नागरिक या शहरासाठी मोलाचे योगदान देत आहेत. तसेच या शहराची ओळख सांगणाऱ्या अनेक वास्तूही आहेत. अशाच वास्तू आणि मुंबईकरांना या ‘रेड हार्ट’मध्ये दाखविण्यात आले आहे. यात मुंबईचे डब्बेवाले, भाजीवाले, मासे विकणाऱ्या कोळी महिला, चौपाटीवरील भेळवाले, सिग्नलवर फुगे विकणारा मुलगा, शहर स्वच्छ करणारा झाडूवाला असे अनेक, तसेच विविध मंदिरे,चर्च, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, डॉ बाबासाहेब आंबडेकरांचा पुतळा, तसेच ऐतिहासिक वास्तू यांच्या डब्ल्यूओएल थ्रीडी प्रिंटच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
‘या’ कलाकृती पाहिल्या का ?
काळा घोडा परिसरासोबतच क्रॉस मैदान, हॉर्निमन सर्कल अशा ठिकाणी विविध कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. यात पंख असणारा घोडा, भारतातील विविध भागातील कापडाची खासियत सांगणारा लाकडी तंबू, तसेच ‘बाई आणि चौकट’ या विषयावरील कलाकृती सुमित पाटील यांनी साकारली आहे. तसेच त्यांनी काळा घोडा येथील कंपास बॉक्समधील साधनांना जैवविविधतेच्या माध्यमातून साकारले आहे.

