खरा काळाघोडा राणीच्या बागेतच!

राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळच हिरवळीवर हा ब्रिटीशकालीन काळाघोडा मोठय़ा ऐटीत उभा आहे.

फोर्ट परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरीसमोरच्या परिसराची ‘काळाघोडा’ नावाने असलेली ओळख येथे नव्याने काळाघोडय़ाची प्रतिकृती उभारून जपण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला असला तरी येथील मुळचा काळाघोडा पाहण्याकरिता देशीविदेशी पर्यटकांना  भायखळ्याच्या राणीच्या बागेला भेट द्यावी लागेल.

हा परिसर काळाघोडा नावाने ओळखला जात असला तरी नावाला शोभेल असे या परिसरात काहीच नव्हते. त्यामुळे काळाघोडा  नावाला शोभेल अशा काळाघोडयाच्या प्रतिकृतीचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. काळाघोडा असोसिएशनच्या सदस्यांनी या काळाघोडयाची प्रतिकृती उभारण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्या ठिकाणी असलेला ब्रिटिशकालीन मूळ काळाघोडा कुठे आहे याचा ठावठिकाणा अनेकांना नसतो. खरेतर या काळाघोडय़ाचे वास्तव्य गेली अनेक वर्षे भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात आहे.

राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळच हिरवळीवर हा ब्रिटीशकालीन काळाघोडा मोठय़ा ऐटीत उभा आहे. भायखळ्याच्या राणीच्या बागेत प्रवेश करताच समोरच एक भव्य अश्वारुढ पुतळा नजरेस पडतो. कांस्य धातू घडविला गेलेला हा पुतळा ब्रिटीश राजे आल्बर्ट एडवर्ड सातवा यांचा आहे. त्यांचा हा अश्वारूढ पुतळा म्हणजेच प्रसिद्ध काळाघोडा. या पुतळा १२ फूट ९ इंच उंच आहे. सर जोसेफ एडगर बोअम या शिल्पकाराने हा पुतळा घडविला होता. १८७६ मध्ये सर आल्बर्ट ससून या दानशूर उद्योगपतीने प्रिन्स ऑफ वेल्स आल्बर्ट एडवर्ड यांच्या मुंबई भेटीनिमित्त देणगीदाखल त्यांना दिला होता.

सुरुवातीला हा पुतळा दक्षिण मुंबईतील रॅमपार्ट रो (आताचा के. दुभाष मार्ग ) आणि एस्प्लनेड रोड जिथे मिळतात, तिथे डेव्हिड ससून ग्रंथालयासमोर उभा होता. मुंबई महापालिकेने मुंबईतील ब्रिटीशकालीन सर्व पुतळे हटवले. त्यावेळी १९६०मध्ये हा पुतळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील वनस्पती उद्यानात हा पुतळा हलविण्यात आला. मात्र या पुतळ्याच्या नावाने या परिसराला पडलेले नाव कायम राहिले. त्यानंतर तब्बल

५५ वर्षांनी काळाघोडा असोसिएशनच्या पुढाकाराने काळाघोडा परिसराला नवीन काळाघोडा मिळाला. मात्र जुना काळाघोडा इतिहासजमाच झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kala ghoda in rani bagh