मुंबई : काळाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या परिसरात विजेचा धक्का लागून रविवारी आठ वर्षीय मुलीसह दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन केले आहे. मंडपातील विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून त्रुटी आढळल्यास दुरुस्ती होईपर्यंत संबंधित जोडणीचा वापर न करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत.
गणेशोत्सवात मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, ध्वनिव्यवस्था आणि विविध विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. त्याचवेळी मंडपात भाविकांची मोठी गर्दी होत असते. काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती मंडप प्रवेशद्वाराजवळ रविवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटची घटना घडली. मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व शीतपेयाच्या स्टॉलजवळ अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे परिसरात विद्युतप्रवाह पसरून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात आठ वर्षीय रागिणी यादवचा समावेश होता. तसेच चारजण जखमी झाले. या घटनेनंतर मंडळातील सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न निर्माण झाला असून नुकतेच याप्रकरणी मानवाधिकार आयोग देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने मंडळांना मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंतच्या संपूर्ण कालावधीत विद्युत सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा बंद करण्याची व्यवस्था
मंडपातील विद्युत जोडण्या, तारा, स्वीच, अर्थिंग तसेच रोषणाईसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांची सजावट आणि रोषणाई कितीही आकर्षक असली तरी त्यापेक्षा भाविकांचा जीव अधिक मौल्यवान आहे, असे मत समितीने व्यक्त केले आहे. पावसामुळे ओलावा निर्माण झाल्यास मंडपात आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा तातडीने बंद करता येईल, अशी व्यवस्था ठेवण्यासह अग्निसुरक्षा उपाययोजनांचीही तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या विद्युत सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही आवाहन समितीने केले आहे.
बेस्ट प्रशासनामार्फत मंडळांना सूचना
संपूर्ण विद्युत यंत्रणेचा ‘कनेक्टेड लोड’ मंजूर भाराच्या मर्यादेत असावा. मुख्य तारा, केबल, स्विच, एमसीबी आणि ईएलसीबी यांची क्षमता त्यानुसार असावी. प्रत्येक विद्युत उपकरणासाठी स्वतंत्र आणि योग्य अर्थिंग व्यवस्था करणे तसेच प्रत्येक विद्युत जोडणीला ईएलसीबी बसवून त्याची कार्यक्षमता तपासणे आवश्यक आहे. मुख्य विद्युत तारा पीव्हीसी इन्सुलेशनच्या असाव्यात. त्या तारांमध्ये शक्यतो जोड देऊ नयेत. जोड देणे अपरिहार्य असल्यास योग्य कनेक्टरसह जंक्शन बॉक्सचा वापर करावा. मुख्य वीजवाहिन्या मंडपाच्या किंवा परिसराच्या बाहेरून नेण्याची आवश्यकता असल्यास आर्मर्ड केबलचा वापर करावा, आदी विविध सूचना बेस्ट प्रशासनाने केल्या आहेत.
