मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध काळ घोडा आर्ट फेस्टिवल (कला महोत्सव ) आजपासून सुरू होत असून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत हा महोत्सव सुरु राहणार आहे. यादरम्यान विविध सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांसोबतच चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच लहान मुलांसाठी कार्यशाळा, विविध चर्चासत्रे अशा चारशेहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शंभरहुन अधिक कलाकृती पाहता येणार असून कलाक्षेत्रातील मान्यवर कलाकार यावेळी सहभागी होणार आहेत.
मागील २६ वर्षांपासून मुंबईतील काळा घोडा कला महोत्सव हा केवळ शहर आणि उपनगरातील कलाप्रेमींसाठीच नाहीच तर देशातील आणि परदेशातील कलप्रेमींसाठीही आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यानिमित्ताने मुंबईत कलाकारांचा आणि कलाप्रेमींचा मेळा भरतो. या नऊ दिवसांत लाखो कलाप्रेमी या महोत्सवाला भेट देतात.
कलेच्या प्रदर्शनासोबतच मुंबईतील गौरवशाली ऐतिहासिक वारशाचे दर्शनही कलाप्रेमींना या निमित्ताने होते. मुंबईतील के. दुबाश मार्ग, छत्रपत्री शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, क्रॉस मैदान, यशवंतराव चव्हाण सेंटर, डेव्हिड ससून ग्रंथालय, हॉर्निमन सर्कल गार्डन तसेच २५ हुन अधिक सभागृह आणि मोकळ्या जागांमध्ये हा महोत्सव साजरा होणार आहे. यात चित्रपट आणि नाटय महोत्सव, साहित्यिक कार्यक्रम, हेरिटेज वॉक, दृश्य कला, लोककला, वास्तूकलेवरील विशेष कार्यक्रम, स्टॅन्ड अप कॉमेडी याचसोबतच विविध कलात्मक वस्तू, दागिने, कलाकृती यांचे प्रदर्शनही यात पाहता येईल.
काळा घोडा महोत्सवाच्या संकेतस्थळानुसार, हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून मोफत प्रवेश असेल. मात्र काही कार्यक्रमांसाठी संकेतस्थळावर मोफत नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. अधिक माहितीसाठी kalaghodaassociation.com या काळा घोडा महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

