मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, बीकेसीवरून वांद्रे – वरळी सागरी सेतूकडे जाणे सोपे व्हावे यासाठी कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पातील धारावी जंक्शनकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण कले.

मात्र हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. काम पूर्ण होऊनही एमएमआरडीएने पुलाचे लोकार्पण न केल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार वरुण सरदेसाई आक्रमक झाले. त्यांनी बुधवारी पाहणी करून पूल तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. तसेच पुलावरील रस्ता रोधक हटविले आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र काही मिनिटातच एमएमआरडीएने पूल वाहतुकीसाठी बंद केला.

बीकेसीमध्ये जेणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. परिणामी, कलानगर जंक्शन आणि बीकेसीमध्ये कायम वाहतूक कोंडी होत आहे. गर्दीच्या वेळी या वाहतूक कोंडीत आणखी वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने कलानगर जंक्शन येथे तीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. वांद्रे – वरळी सागरी सेतू – बीकेसी दरम्यान ८०४० मीटर लांबीचा आणि ७.५० मीटर रुंदीचा दोन पदरी एक पूल, तर बीकेसी – वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान ६५३.४० मीटर लांबीचा आणि ७.५० मीटर रुंदीचा दुसरा पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

तिसरा पूल धारावी जंक्शन ते वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यात उभारण्यात येणार असून दोन पदरी पुलाची लांबी ३४०० मीटर आणि रुंदी ७.५० मीटर अशी आहे. या तीन पुलांपैकी बीकेसी – वांद्रे-वरळी सागरी सेतू पूल आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू – बीकेसी पूल याआधीच वाहतूक सेवेत दाखल झाले आहेत. तर तिसऱ्या धारावी जंक्शन -ते सागरी सेतू पुलाचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले असून पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असल्याने वाहतूक सेवेत दाखल होऊ शकला नाही.

काम पूर्ण होऊनही पूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने बुधवारी वरुण सरदेसाई यांनी पुलाची पाहणी करत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पूल तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र काही किरकोळ कामे अपूर्ण असल्याचे म्हणत अधिकाऱ्यांनी पूल सुरू करण्यास असमर्थता दर्शविली. काही वेळाने पुलावरील रस्ता रोधक हटवून पूल सुरू करण्यात आला. त्यावरून गाड्याही गेल्या. मात्र काही मिनिटांतच हा पूल एमएमआरडीएने बंद केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलाच्या लोकार्पणासाठी मंत्र्यांची वेळ मिळू शकलेली नाही. त्यामुळे हा पूल वाहतूक सेवेत दाखल केला जात नसल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी यावेळी केला. याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पथदिव्यांची वीज जोडणी आणि अन्य काही कामे शिल्लक आहेत. पथदिव्यांशिवाय पूल वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. यामुळे अपघाताचा धोका आहे. त्यामुळे उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करून हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.