मुंबई : भारतीय ज्ञानाच्या नावाखाली ‘कालायन’ यंत्रात खगोल विज्ञान आणि ज्योतिष या दोन परस्परविरोधी गोष्टींची सरमिसळ केली गेली असून हे यंत्र बसवून मंत्रालय आणि विधीमंडळाचे ज्योतिष मार्गदर्शन केंद्र बनू देऊ नका, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली आहे. तसेच, हे यंत्र बसविण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्रालय परिसर आणि विधानभवन येथे ‘कालायन’ उपकरण बसविण्याकरिता १० लाख ९७ हजार ४०० रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार कालायन हे केवळ वेळ दाखवणारे घड्याळ नसून यात राशी, नक्षत्रे, पंचांग अशा सर्व गोष्टींची प्रमाण वेळेशी सरमिसळ आहे. मात्र, ‘यामधून कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेले ज्योतिष आणि खगोल विज्ञान हे एकच असल्याचा भास निर्माण केला जात आहे. ग्रहांची स्थिती, त्यांची गती, सूर्योदय-सूर्यास्त यांची अचूक गणना करणे हा खगोलशास्त्राचा विषय आहे. मात्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीचे भविष्य, व्यक्तिमत्त्व, भाग्य किंवा जीवनातील घटना सांगता येतात, हा ज्योतिषाचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे खगोलशास्त्रीय माहिती आणि ज्योतिषीय विश्वास यांना एकाच ‘विज्ञानाधारित’ चौकटीत मांडणे दिशाभूल करणारे आहे,’ अशा शब्दांत समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, प्रवीण देशमुख ,नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, श्रीपाल लालवाणी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

एकाच खासगी संस्थेला हे उपकरण बसविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक निधीतून हा खर्च करण्यापूर्वी उपकरणाची वैज्ञानिक उपयुक्तता, शैक्षणिक मूल्य आणि शासनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी असलेली सुसंगती यांचे स्वतंत्र आणि तज्ज्ञ परीक्षण झाले आहे का, असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे.

‘मंत्रालय हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे केंद्र आहे. विधानभवन हे लोकशाहीचे सर्वोच्च संस्थात्मक व्यासपीठ आहे. या ठिकाणी शासनाने अशा उपकरणाला अधिकृत स्थान देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ज्योतिषीय विचारांना शासकीय प्रतिष्ठा देण्यासारखे आहे. मंत्रालय हे धोरणनिर्मितीचे आणि लोकसेवेचे केंद्र असावे. ते ज्योतिष मार्गदर्शन केंद्र बनता कामा नये,’ अशा कठोर टीपण्णी समितीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केली आहे.

संविधान मूल्यविरोधी

हा निर्णय संविधानातील मूल्यांच्या विरोधात असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. ‘भारतीय संविधानाच्या कलम ५१(अ)(ह) नुसार नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक वृत्ती विकसित करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. शासनाकडून तर अधिक गांभीर्याने या मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन अपेक्षित आहे. त्यामुळे, शासकीय वास्तूंमध्ये विज्ञानाच्या नावाखाली वैज्ञानिकदृष्ट्या असिद्ध ज्योतिषीय दाव्यांना प्रतिष्ठा देणे, हा संविधानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भावनेशी विसंगत प्रश्न आहे,’ अशी मांडणी अंनिसने केली.

अंनिसचा विरोध नाही, पण…

अंनिसचा भारतीय संस्कृती, पंचांग किंवा पारंपरिक कालगणनेच्या अभ्यासाला विरोध नाही. भारतीय कालगणनेचा इतिहास, प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील योगदान आणि विविध कालमापन पद्धती यांचा अभ्यास व प्रदर्शन निश्चितच केले जाऊ शकते. परंतु त्यासाठी खगोलशास्त्र आणि ज्योतिष यांच्यातील स्पष्ट सीमारेषा कायम ठेवणे आवश्यक आहे, असे अंनिसचे मधुकर गायकवाड, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर आदींचे म्हणणे आहे.