मुंबई : कलिना येथील १८४ एकर परिसरात पसरलेली एअर इंडियाची ऐतिहासिक कर्मचारी वसाहत आता रिकामी करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या मालकीच्या १०६ इमारतींमधील १,६८३ घरांसाठी जमीन ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’कडे हस्तांतरित केली आहे. गेल्या काही आठवड्यांत, तेथील १५० रहिवाशांपैकी उरलेल्यांनी घरे रिकामी केली.
एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या वसाहतींपैकी पहिली वसाहत १९५५ मध्ये बांधण्यात आली. पहिल्या कर्मचारी वसाहतीनंतर १९८० च्या दशकात आणखी तीन वसाहती उभारल्या. १०६ इमारतींमधील १,६८३ घरांच्या चार वसाहती सरकारी मालकीच्या एआय असेट होल्डिंग्ज लिमिटेडकडून ‘एमआयएएल’कडे हस्तांतरित झाल्या आहेत.
एअर इंडियाचे खासगीकरण २०२२ मध्ये झाले. त्यानंतर चार वर्षे कर्मचारी आणि संघटनांनी निवासस्थानासाठी लढा दिला. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कर्मचाऱ्यांच्या विरोधात निकाल लागला. न्यायालयाने रहिवाशांना जागा रिकामी करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली. त्यानंतर, एमआयएएलने रहिवाशांच्या विनंतीनुसार शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत राहण्याची परवानगी देत जागा रिकामी करण्याची तारीख ३१ मेपर्यंत पुढे ढकलली होती.
रहिवाशांच्या भावना अनावर
‘‘आम्ही कलिना येथील एका जुन्या इमारतीमधील भाड्याच्या घरात राहायला जात आहोत, पण अखेरीस विरारला स्थायिक होऊ. मी येथे तीन दशकांहून अधिक काळ राहिलो, माझी मुले इथेच मोठी झाली, माझ्या आठवणी या वसाहतीशी जोडलेल्या आहेत,’’ असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
२०२२ मध्ये येथे ६०० कुटुंबे होती. त्यानंतर एअर इंडियाचे बहुतेक कर्मचारी निघून गेले. ‘‘एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या दोन फ्लाइट अटेंडंट काही दिवसांपूर्वी निघून गेल्या. इतर बहुतेक रहिवासी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडचे असून तेही या आठवड्याच्या शेवटी निघून जातील,’’ असे ‘एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्ड’चे सरचिटणीस जॉर्ज अब्राहम यांनी सांगितले. कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे वकील अशोक शेट्टी म्हणाले, ‘‘निवासव्यवस्था एअर इंडियाच्या गृहनिर्माण वाटप नियमांमध्ये नमूद केलेली एक अत्यावश्यक सेवा असून त्यात मनमानीपणे बदल केला जाऊ शकत नाही.’’
कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप
प्रकरण न्यायालयांमध्ये असतानाही, एअर इंडिया, एअर इंडिया इंटरनॅशनल एसएल आणि एअर इंडिया इंटरनॅशनल एसएलच्या व्यवस्थापनाने वसाहतीतील रहिवाशांवर दबाव आणला. पगारातून कापलेल्या दंडात्मक ताबा शुल्काची रक्कम भाड्याव्यतिरिक्त बाजारभावाच्या दुप्पट होती. काही प्रकरणांत, महिन्याच्या पगाराच्या जवळपास ७५ टक्के रक्कम कापली. सवलतीचे प्रवास लाभ रोखून धरले. पाण्याची- विजेची बिले, वसाहतीतील सुरक्षा आणि देखभाल कर्मचाऱ्यांचे वेतन कित्येक महिने थकवल्याचा आरोप अब्राहम यांनी केला.
अनेक क्रीडापटूंना घडविले
कलिना वसाहत कधीही केवळ निवासी नव्हती. येथील मैदानावर एमसीए प्रशिक्षण शिबिरांसह बीसीसीआय व भारताच्या महिला संघाची सराव सत्रे व्हायची. पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांसारखे खेळाडू या मैदानावर घडले. जुन्या एअर इंडिया कॉलनीमधील फुटबॉलच्या मैदानावरून अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. येथील दोन शाळांमध्ये अंदाजे ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. या शाळा शासकीय अनुदानित असून त्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्या नसल्याने त्या सुरूच राहतील.
अनेक आठवणी…
जुलै २०१८ च्या पुरादरम्यान संपूर्ण शहर ठप्प होते. एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरले होते. त्यावेळी कलिनाचे अभियंते चालत विमानतळावर गेले होते. २०२० मध्ये करोना काळात पीपीई किट-औषधे घेऊन आंतरराष्ट्रीय मालवाहू विमाने विमानतळावर उतरली, तेव्हा लोडर, मजूर, इंजिनिअर यांच्यासह कॉलनीतील रहिवाशांनी विमानतळापर्यंतचा १० मिनिटांचा रस्ता चालत जाऊन स्वतःच मालवाहू विमानांतील माल उतरवला होता, असे एअर इंडिया स्टाफ कॉलनी ग्राहक सहकारी संस्थेचे अध्यक्ष एम. पी. देसाई यांनी सांगितले.
