मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई, ठाण्याहून लातूरला पाच तासांत पोहोचता यावे यासाठी कल्याण – लातूर जनकल्याण महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या संरेखनाचे काम पूर्ण झाले असून त्यानुसार हा महामार्ग ४५० किलोमीटरचा असणार आहे. संरेखनाचा प्रस्ताव येत्या आठ-दहा दिवसांत राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, हा महामार्ग धाराशीवमधून न्यावा अशी धाराशीववासीयांची मागणी आहे. तर धाराशीवमधून महामार्ग नेल्यास बीड जिल्हा वगळला जाईल, असा मुद्दा उपस्थित करीत बीडवासीयांनी हा महामार्ग बीडमधूनच न्यावा अशी ठाम भूमिका घेतली होती. या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांची मागणी लक्षात घेत एमएसआरडीसीने सुवर्णमध्य साधत दोन्ही जिल्ह्यांना अंतरबदल मार्ग देत महामार्गाशी जोडले आहे.

मुंबई, ठाण्यातून लातूरला जाण्यासाठी किमान १२ तास लागतात. पुणे – सोलापूर मार्गे किंवा बार्शी मार्गे लातूरला जावे लागते. मुंबई – लातूरदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी १२ तासांवरून ५ तासांवर आणण्यासाठी एमएसआरडीसीने आपल्या ४००० किलोमीटरहून अधिकच्या रस्ते प्रकल्पांतर्गत कल्याण – लातूर महामार्ग प्रस्तावित केला होता. मात्र हा महामार्ग अनेक वर्षे कागदावरच होता. आता मात्र हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने नुकतीच या महामार्गास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने या प्रकल्पाचे संरेखन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, या महामार्गाची राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर, ढोबळमानाने कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या भागातून महामार्ग जाणार हे जाहीर झाले. त्यानंतर या महामार्गावरून वाद निर्माण झाला.

लातूरच्या जवळील धाराशीव जिल्ह्याला वगळण्यात आल्याने, तसेच महामार्गाची या जिल्ह्याला जोडणी नसल्याने धाराशीववासीयांनी नाराजी व्यक्त करून हा जिल्हा या महामार्गाशी जोडण्याची मागणी केली. तर दुसरीकडे धाराशीवमधून महामार्ग नेताना बीड वगळावे लागण्याची शक्यता व्यक्त करत बीडवासीयही आक्रमक झाले. त्यांनी बीडमधूनच महामार्ग नेण्याची ठाम भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर संरेखन निश्चित करताना एमएसआरडीसीने सुवर्णमध्य काढून महामार्गाला धाराशीव आणि बीड दोन्ही जिल्ह्यांना जोडणी दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बीड आणि धाराशीव जिल्ह्यांना अंतरबदल मार्गाने जोडण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कल्याण – लातूर महामार्गाला जनकल्याण महामार्ग असे नाव देण्यात आले असून संरेखनानुसार हा महामार्ग आता ठाणे, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशीव आणि लातूर अशा सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. संरेखनानुसार हा महामार्ग ४५० किमीचा असणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. संरेखन निश्चित झाले असून आता आठ-दहा दिवसांत संरेखन अंतिम करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी त्यास दुजोरा दिला.