मुंबई : कल्याण-मुरबाड मार्गावरील एसटी बससेवेच्या फेऱ्यांमध्ये करण्यात आलेली वाढ प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरली असून, या निर्णयाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढीव फेऱ्यांमुळे प्रवासीसंख्या आणि बसची सरासरी क्षमता याची आकडेवारी स्पष्ट होत असल्याने प्रवाशांचा या सेवेला सकारात्मक कल असलयाचे दिसून येत आहे.
कल्याण आगारातून ५ मे २०२६ पर्यंत या मार्गावर दररोज ४८ फेऱ्या चालवल्या जात होत्या. त्यावेळी दररोज सरासरी २,२३८ प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. मात्र, वाढत्या प्रवासीसंख्येमुळे या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी एसटी महामंडळाकडे तक्रार केली होती. यामुळे अनेक प्रवासी नाईलाजाने अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत होते. याच पार्श्वभूमीवर घडलेल्या एका अपघाताची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मार्गावरील एसटी फेऱ्या तातडीने वाढविण्याचे आदेश दिले.
या निर्णयानंतर कल्याण-मुरबाड मार्गावरील फेऱ्यांची संख्या ४८ वरून थेट १०८ करण्यात आली. परिणामी, सद्यस्थितीत या मार्गावर दररोज सरासरी ५,०८० प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच प्रवासीसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसही सेवेत दाखल करण्यात आल्या असून, त्यालाही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
नागरिकांची गैरसोय दूर
कल्याण-मुरबाड मार्गावरून पुढे उंबर, अहिल्यानगर या भागांकडे जाणाऱ्या विविध आगारांच्या एसटी बसमध्येही मुरबाड ते सरळगाव परिसरातील प्रवाशांना चढ-उताराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सक्षम आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध एसटी सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख बनली आहे.
प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे एसटीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी वाढत आहे. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील. एसटी ही सामान्य जनतेची जीवनवाहिनी असून, तिचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
