मुंबई : ठाणे ते नवी मुंबई प्रवास मेट्रोने अतिजलद करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पात कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो १२ मार्गिकेचा समावेश आहे. या मार्गिकेच्या कामाला मार्च २०२४ मध्ये सुरुवात झाली असून अवघ्या अडीच वर्षांत या मार्गिकेचे तब्बल ५३.८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाला आणखी वेग देत ही मार्गिका मे २०२८ पर्यंत पूर्ण करून मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास कल्याण ते तळोजा प्रवास अतिजलद होणार असून प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा नवी मुंबईपर्यंत विस्तार मेट्रो १२ मार्गिकेअंतर्गत केला जात आहे. २३.५७६ किमी या उन्नत मार्गिकेत एकूण १९ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, एपीएम कल्याण, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खु.), बाळे, वाकळण, तुर्भे, पिसारवे डेपो, पिसारवे, अमंडूत (तळोजा) अशी ही स्थानके आहेत. या मार्गिकेच्या कामाला मार्च २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली. गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला या मार्गिकेच्या कामाचे कंत्राट मिळाले होते, त्यानुसार या कंपनीकडून २०२४ मध्ये कामास सुरुवात करण्यात आली असून केवळ अडीच वर्षांत मेट्रो १२ मार्गिकेचे ५३.८७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
कोणत्याही मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होऊन अल्पावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर काम पूर्ण होणारी ही पहिली मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न मार्गिकेचे काम सुरू होण्याआधीच मार्गी लावण्यात आला होता. तर काम सुरू होण्याआधीच प्रकल्पातील सर्व अडसर दूर करण्यात आले होते. अनेक मेट्रो मार्गिकांच्या कामात कारडेपोचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मार्गिकेच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे चित्र आहे. पण ही मार्गिका यास अपवाद ठरली आहे. निळजे-निळजेपाडा येथे अंदाजे ४५ हेक्टर जागा शोधून ती ताब्यात घेत कारशेडचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतर कामास वेग देत काम पुढे जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत मार्गिकेचे ५३.८७ टक्के काम पूर्ण झाले असून आता उर्वरित काम वेगाने पूर्ण करून मे २०२८ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास कल्याण ते तळोजा प्रवासाच्या वेळेत ४५ मिनिटांची बचत होणार आहे. तर मेट्रो १२ मार्गिका अमंडूत येथे नवी मुंबई मेट्रोशी जोडली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यान सुरळीत दळणवळण शक्य होईल. कल्याण आणि नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद-गारेगार प्रवास करता येईल.
