कमला मिल कम्पाऊंडमधील ‘वन अबव्ह’ रुफटॉप बारमधील आगीच्या घटनेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेवर टीकास्त्र सोडले आहे. कमला मिलमध्ये एवढ्या छोट्या जागेत ९६ रेस्तराँना परवानगी मिळालीच कशी असा सवाल उपस्थित करत संजय निरुपम यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

कमला मिल कंपाऊंडमधील ‘वन अबव्ह’ या रुफटॉप बारमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन महापालिकेवर टीकास्त्र सोडले. कमला मिल कम्पाऊंड या छोट्याशा परिसरात ९६ रेस्तराँ आहेत. त्यांना महापालिकेकडून परवानगी मिळालीच कशी, या रेस्तराँमध्ये फायर ऑडिटही झाले नव्हते. पब आणि रेस्तराँ मालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा मृत्यू झाला, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी तीन महिन्यांपूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांचे या प्रकारांकडे लक्ष वेधले होते. मात्र, महापालिकेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला आहे. आता महापालिका त्यांच्या अधिकाऱ्यांनाही या घटनेसाठी जबाबदार ठरवणार का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

सोशल मीडियावरही या घटनेवरुन संताप व्यक्त होत आहे. रुफटॉप बार ही संकल्पना राबवली जात असताना या बारमधील सुरक्षेची जबाबदारी कोणाची, महापालिकेने या बारमधील फायर ऑडिट केले होते का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.