मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार केला जाणार आहे. त्यानुसार दुरुस्ती मंडळाकडून सी अँड डी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. दुरुस्ती मंडळ आणि कंत्राटदार कंपनीमध्ये गुरुवारी करार करण्यात आला. त्यामुळे आता रहिवाशांच्या पात्रता निश्चिती आणि संमती पत्र घेण्याच्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीत या प्रक्रियेस सुरुवात होणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कामाठीपुरा परिसरात सुमारे ३४ एकरावरील ९४३ इमारती असून यात आठ हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. आता या इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दुरुस्ती मंडळाकडे असून राज्य सरकारने पुनर्विकासाची जबाबदारीही दुरुस्ती मंडळाकडे सोपवली. त्यानुसार मंडळाने निविदा प्रक्रियेद्वारे भागीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्सची (एएटीके कन्स्ट्रक्शन) कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण नुकतेच रहिवाशांसमोर करून त्यांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

तर आता हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत गुरुवारी दुरुस्ती मंडळ आणि नियुक्त कंपनीमध्ये करार करण्यात आल्याची माहिती दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आली आहे. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत आंतरराष्ट्रीय स्तरावर, शाश्वत विकास या पुनर्विकासाअंतर्गत केला जाणार असल्याचा दावा यावेळी विकासकांकडून आणि म्हाडाकडून करण्यात आला.

विकासक कंपनी आणि दुरुस्ती मंडळामध्ये करार झाल्याने आता दिवाळीपासून कामाठीपुरातील ८००१ रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्या कामास सुरुवात केली जाईल. तर त्याचवेळी रहिवाशांची संमती घेण्याच्याही प्रक्रियेस सुरुवात केली जाईल, अशी माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांकडून घरे रिकामी करून घेतली जातील, त्यानंतर इमारतींचे पाडकाम करून पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. २०२७ मध्ये पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

असा आहे कामाठीपुरा समूह पुनर्विकास

अंदाजे ३४ एकरावरील परिसराचा पुनर्विकास पुनर्विकासात ९४३ उपकरप्राप्त तर ३४९ विना-उपकरप्राप्त अशा एकूण १२९२ इमारतींचा समावेश एकूण ८००१ रहिवाशांचे होणार पुनर्वसन (यात ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरूंचा समावेश) ८०० जमीन मालकांचेही होणार पुनर्वसन, रहिवाशांना ५०० चौ. फुटांची मिळणार घरे, प्रत्येक सदनिकेमागे ५ लाख रुपयांचा कॉर्पस फंड, पुनर्वसित इमारती ४० ते ५० मजली असणार, विक्रीसाठीच्या इमारती ६० ते ८० मजली असणार, पुनर्विकासातून म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाला सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, यामधून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती प्रस्तावित आहे. रहिवाशांना प्रतिमाह २५ हजार रुपये घरभाडे मिळणार तर अनिवासी रहिवाशांना २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंतचे प्रतिमाह घरभाडे मिळणार.