मुंबई: दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून केला जाणार आहे. त्यानुसार नुकताच या प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याचे सादरीकरण रहिवाशांसमोर म्हाडाकडून करण्यात आले. यावेळी रहिवाशांना तात्पुरत्या स्थलांतरासाठी प्रतिमाह २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले. तर अनिवासी रहिवाशांच्या भाड्याच्या रकमेत वाढ करण्याची मागणी मान्य करून आता त्यांना प्रतिमाह २५ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंतचे भाडे देण्यात येणार आहे.
सुमारे ३४ एकर क्षेत्रावरील कामाठीपुरा परिसराचा समूह पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार करण्यात येत आहे. त्यानुसार भागिरथी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि माठी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सी अँड डी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीकडून प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे शुक्रवारी रहिवाशांसमोर सादरीकरण करण्यात आले. आराखड्यानुसार कामाठीपुरा परिसरातील ४७५ उपकरप्राप्त, २५९ विना उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे ८००१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार असून यातील ६६२५ रहिवासी निवासी तर १३७६ रहिवासी अनिवासी आहेत. तसेच ८०० जमीनमालकांनाही नियमानुसार मोबदला दिला जाणार आहे. निवासी रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे दिली जाणार असून ही घरे उत्तुंग इमारतीत असणार आहेत. या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाला सुमारे साडेचार हजार घरे सोडतीद्वारे उपलब्ध होणार आहेत. तसेच विक्री घटकाअंतर्गत येथे उत्तुंग निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार आहेत.
पुनर्विकासासाठी रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार असून यासाठी रहिवाशांना तीन वर्षांचे घरभाडे देण्यात येणार असल्याचे यावेळी म्हाडाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार निवासी रहिवाशांना प्रतिमाह २५ हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. तर घरे रिकामी करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. दरम्यान अनिवासी रहिवाशांच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी होती. त्यानुसार ही मागणी मान्य करत म्हाडाने अनिवासी रहिवाशांच्या भाड्यात वाढ केली आहे. २०० चौ. फुटांच्या गाळ्यांसाठी प्रतिमाह २५ हजार रुपये, २०० ते ४०० चौ. फुटांच्या क्षेत्रासाठी प्रतिमाह ३० हजार रुपये आणि ४०० चौ. फुटांपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिमाह ३५ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. निवासी रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ घरभाडे तर एका वर्षाचा घरभाड्याचा धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आली. तेव्हा असा हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी विकासक आणि दुरुस्ती मंडळामध्ये करार होणार असून त्यानंतर संमतीपत्र घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. त्यानंतर पात्रता निश्चिती पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. मात्र यास आणखी काही महिन्यांचा अवधी असल्याने २०२७ मध्ये कामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
