मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पुनर्विकासाचे कंत्राट बहाल करण्यात आले असून लवकरच पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून शुक्रवारी या आराखड्याचे सादरीकरण रहिवाशांसमोर केले जाणार आहे.
या आराखड्यानुसार प्रकल्प नेमका कसा असेल, पुनर्वसित इमारती किती मजली आणि कशा असतील तसेच प्रकल्पात कोणत्या सुविधा पुरविण्यात येतील यासह अन्य बाबींची माहिती रहिवाशांना यावेळी दिली जाणार आहे. या आराखड्यानुसार ८ हजार रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे दिली जाणार असून प्रति सदनिका ५ लाख रुपये कॉर्पस फंड दिला जाणार आहे. पुनर्वसित इमारती ४० ते ५० मजली आणि विक्रीसाठीच्या इमारती ६० ते ८० मजली असणार आहेत.
कामाठीपुरा परिसरात सुमारे ३४ एकरावरील ९४३ इमारती असून यात आठ हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. आता या इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दुरुस्ती मंडळाकडे असून राज्य सरकारने पुनर्विकासाची जबाबदारीही दुरुस्ती मंडळाकडे सोपवली. त्यानुसार मंडळाने निविदा प्रक्रियेद्वारे भागीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्सची (एएटीके कन्स्ट्रक्शन) कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) म्हणून नियुक्ती केली आहे.
नियुक्त विकासकाकडून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यानुसार निवासी रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर, तर अनिवासी रहिवाशांना २२५ चौरस फुटांचे गाळे देण्यात येणार आहेत. तर ८०० मालकांच्या मोबदल्याचे धोरणही राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार ५० चौरस मीटरपर्यंतची जागा असलेल्या मालकांना ५०० चौरस फुटांचे एक घर मिळणार आहे. तर ५१ ते १०० चौरस मीटर जागा असलेल्या मालकांना ५०० चौरस फुटांची दोन घरे, ज्यांची जागा १०१ ते १५० चौरस मीटर आहे त्यांना ५०० चौरस फुटांची तीन घरे मिळणार आहेत. त्याहून अधिक जागा असलेल्यांना याच नियमानुसार घरे, मोबदला दिला जाणार आहे.
या पुनर्विकासाअंतर्गत आठ हजार रहिवाशांचे उत्तुंग अशा ६० ते ६५ मजली इमारतींत पुनर्वसन केले जाणार आहे. तर विक्री घटकांअंतर्गत ७५ ते ८० मजली इमारती विकासक बांधणार असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. पुनर्वसित इमारती या ६० ते ६५ मजली असणार आहेत. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च येणार आहे. तो रहिवाशांना परवडावा यासाठी प्रति सदनिका ५ लाख रुपये कॉर्पस फंड देण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कॉर्पस फंडाच्या व्याजाच्या रकमेतून इमारतींची देखभाल-दुरुस्ती करणे सोपे होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या पुनर्विकासाअंतर्गत विकासकाकडून विक्री घटकाच्या ८.२५ टक्के इतके क्षेत्र दुरुस्ती मंडळाला दिले जाणार आहे. हे क्षेत्र ४० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक असणार आहे. यातून दुरुस्ती मंडळाला ९०० ते १००० घरे उपलब्ध होणार असून या घरांची विक्री भविष्यात मुंबई मंडळाच्या माध्यमातून सोडतीद्वारे केली जाणार आहे. ८ हजार रहिवाशांना तात्पुरत्या स्थलांतरासाठी प्रत्येकी प्रति महिना २५ हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. तर पुनर्वसित इमारतींचे बांधकाम होऊन पुनर्वसन पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. अशा या पुनर्विकासाच्या आराखड्याचे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कामाठीपुरा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने सादरीकरण केले जाणार आहे. अखिल पद्मशाली समाज, भावना बाग, कामाठीपुरा, सहावी गल्ली येथे हे सादरीकरण होणार आहे.
