मुंबई :कांदिवलीमधील एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. समता नगर पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.

कांदिवली (पूर्व) परिसरातील क्रांतिनगर येथे ४५ वर्षीय आरोपी डॉक्टरचा दवाखाना आहे. पीडित तरुणी २४ वर्षांची असून याच परिसरात राहते. पीडित तरुणी बहिणीसोबत रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी डॉक्टरच्या दवाखान्यात तपासणीसाठी आली होती. त्यावेळी डॉक्टरने कंपाऊंडरला, तसेच तिच्या बहिणीला बाहेर जाण्यास सांगितले.

यानंतर दरवाजा बंद करून डॉक्टरने पीडित तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ‘अचानक झालेल्या या प्रकाराने मी घाबरले. मात्र प्रतिकार करून आरडाओरड केल्यानंतर माझी बहिण आत आली आणि माझी सुटका झाली’, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर सोमवारी समता नगर पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) आणि कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीची पत्नीही डॉक्टर असून हा दवाखाना तिच्या नावाने नोंदणीकृत आहे. आम्ही पीडितेचा जबाब घेतला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती समता नगर पोलिसांनी दिली.