मुंबई : प्रेमप्रकरणाला आई आणि मोठय़ा बहिणीने केलेला विरोध आणि यावरून वारंवार होणाऱ्या वादामुळे संतापलेल्या अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने आई आणि बहिणीचा खून केला. त्यानंतर या प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना कांदिवलीत बुधवारी रात्री घडली.

कांदिवली पश्चिमेकडील भागात एक व्यक्ती धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कोयता घेऊन फिरणारी व्यक्ती राधाबाई रुग्णालयात असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एक महिला रक्ताच्या थारोळय़ात पडलेली दिसली. स्वयंपाकघरात दुसरी महिला जखमी अवस्थेत होती. तर पहिल्या मजल्यावरील एक खोलीत एक महिला आणि पुरुषाने गळफास घेतल्याचे दिसले.त्यांना उपचारासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय पाठविण्यात होते. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

प्रेमाला विरोध केल्याने..

हत्या झालेली महिला ही डॉक्टर होती. ती  तिच्या दोन मुलींसह राहत होती. त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर डॉक्टरच्या अल्पवयीन मुलेचे प्रेम होते. यावरून कुटुंबात वारंवार वाद होत होते. यातूनच अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने आई आणि बहिणीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे चौकशीत उघड झाले.